अजित गव्हाणे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने महाआघाडीत ठिणगी, ठाकरेच्या शिवसेनेचे पदाधिकारी नाराज

0
82

महाराष्ट, १७ जुलै (पीसीबी) – राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे व त्यांच्यासह २८ राष्ट्रवादीतील पदाधिकाऱ्यांनी आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याची संधी मिळावी, याकरिता अजित गव्हाणे यांनी हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे. अजित गव्हाणे हे भोसरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे. त्यामुळेच त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला.

भोसरी विधानसभा मतदारसंघावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचाही दावा आहे. त्यानुसार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी, माजी नगरसेविका सुलभा उबाळे, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट यांच्यासह भोसरीतील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी भोसरी विधानसभा मतदारसंघ आपल्या पक्षाला सुटावा, यासाठी प्रयत्न करत आहे. गव्हाणे यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेतील किंबहुना महाविकास आघाडीतील अस्वस्थता वाढली आहे.दरम्यान, सुलभा उबाळे यांच्या पुढाकाराने शिरुर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दि. १८ जुलै रोजी आयेजित केलेला जनता दरबार रद्द केला आहे. अजित गव्हाणे यांच्यामुळे महाविकास आघाडीतील निष्ठावंतांमध्ये असलेल्या नाराजीमुळे हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. तसेच, गव्हाणे यांचा प्रवेश पुण्यातील मोदीबाग येथे झाला. त्यावेळी खासदार कोल्हे उपस्थित नव्हते. त्यामुळे याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

निष्ठावंत शिवसैनिक उद्या ‘मातोश्री’ कडे जाणार

भोसरी विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका सुलभा उबाळे निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे भोसरी विधानसभा मतदारसंघात त्यांनी या अनुषंगाने आपले काम सुरू केले आहे. हा मतदारसंघ शिवसेना पक्षाला सुटावा यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु आज अजित गव्हाणे यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघ लढविण्यासाठी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केल्याने भोसरी मधील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला. तसेच भोसरी विधानसभा मतदारसंघ हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाला सुटावा, अशी मागणी करण्यासाठी हे सर्व पदाधिकारी उद्या मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपली मागणी करणार असल्याचे सांगितले जात आहे. आज या विषयावर चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना वतीने बैठक झाली. या बैठकीत अजित गव्हाणे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने आपण सर्व नाराज झाल्याचे सांगितले आहे. तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघात खा. डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या विरोधात काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना आज शरद पवार यांनी पक्षात प्रवेश दिल्यानेही आपण नाराज असल्याचे या पदाधिकाऱ्यांनी प्रसार माध्यमांना सांगितले आहे.