पुणे , दि. 9 (पीसीबी) : “खूप जणांवर आरोप झालेत. त्या आरोपांमध्ये तथ्य नाही. काहीजण केलेल्या आरोपांमुळे व्याकुळ होऊन राजीनामा देतात. धनंजय मुंडेंच स्पष्ट मत आहे की, ‘माझा याच्याशी दुरान्वये संबंध नाही. कोणत्याही संस्थेला या प्रकरणाचा तपास नाही. आता तीन एजन्सी तपास करत आहेत, आणखी तीन एजन्सी त्याचा तपास करण्यासाठी लावा. त्यांनाही तपासायला सांगा’, असं ज्यावेळी एखादी व्यक्ती सांगते, त्यावेळी काम करत असताना दोषी नसलेल्यांवर देखील अन्याय होऊ नये. त्यामध्ये अजित पवार दोषी असेल तरी देखील त्याच्यावर कारवाई होईल”, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.
अजित पवार म्हणाले, सरकार पोलिसांना इतक्या चांगल्या सुविधा देत असताना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न का निर्माण व्हावा. शहराच्या पोलीस प्रमुखाचे हे अपयश आहे. तुम्हाला जमत नसेल तर तसं सांगा. यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. बीड प्रकरणाची वेगवेगळ्या यंत्रणांकडून चौकशी सुरु आहे.कोण कुणाशी, कुठल्या पक्षाशी संबंधित आहे याचा विचार केला जाणार नाही.मुख्यमंत्री देखील तसं म्हणालेत. जो दोषी असेल त्यांना पाठीशी घालणार नाही. त्यांना कठोरात कठोर शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करू.
सुरेश धस यांनी पुरावे द्यावेत. आरोप करताना विचार करावा.आम्ही या प्रकरणात राजकारण आणणार नाही. कुणाला पाठीशी घालणार नाही. बडी मुन्नी कोण ते त्यांना विचारा. असल्या फालतू गोष्टींवर मी बोलणार नाही. इथून पुढे मी नाव घेऊन बोलेन. पालकमंत्री कुणाला करायचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो, असंही अजित पवार यांनी नमूद केलं.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, साखर कारखाना संबंधी प्रश्नाबाबत अमित शहा यांना भेटलो. छगन भुजबळ हा आमचा पक्षअंतर्गत विषय आहे. त्यावर आम्ही मार्ग काढू. पुण्यात कायदा सुव्यवस्था परिस्थिती सुधारली नाही, तर माणूस बदलायला लागेल असं मी पोलीस आयुक्तांना सांगणार आहे. मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहेत त्यामुळे त्यांच्यावर ॲक्शन मोड वर रहायलाच लागते. त्यांचे कौतुक होत तर चांगलेच आहे. पण इतर मंत्री काम करत नाहीत असं कोणी म्हणत असेल तर त्यांच्याकडे काही मुद्दे नाहीत. उगाचच टीका करतात. मी सुरेश धस यांच्या बाबतीत बावनकुळे आणि मुख्यमंत्र्यांना जे सांगायचे ते सांगितले आहे. काय तो योग्य निर्णय घेतील.