दि.३०(पीसीबी)-अनेकदा माणसं जशी भासवली जातात तशी नसतात. नावडतीचे मीठ अळणी समजून विरोधकांनी जनमानसात अजितदादांची प्रतिमा मलीन करण्यासाठी कुठलीही कमतरता ठेवली नाही. कुणावरही झाल्या नसतील इतक्या टीका, आरोप आणि बदनामी दादांच्या वाट्याला आल्या. ऐकीव माहितीवर लोकं सहजासहजी विश्वास ठेवतात म्हणून विरोधकांनी दादांवर केवळ आरोप आणि आरोपच केले. दादा नावाचा माणूस लोकांना कधी समजूनच दिला नाही. मुळात आपल्यावरील आरोपांना महत्त्व न देता आपले काम करत राहणे, हा दादांचा स्वभाव होता. बोलणारे फक्त बोलत राहतात, काम करणारे आपल्या कामातून त्यांना उत्तर देत असतात, हे दादांच्या राजकीय जीवनाकडे पाहिल्यानंतर आपल्याला दिसून येते.
अजितदादा हे रेडिमेड नेतृत्व नव्हते, तर ते मातीतून उमललेले नेतृत्व होते. लहानपणापासूनच लोकांची कामे करत करत त्यांच्यात नेतृत्वगुण विकसित होत गेले. लहानपणी रानच्या वस्तीला कुठे साप निघाला तर साप पकडण्यासाठी शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाणारा सर्पमित्र, १९७१ च्या दुष्काळात लोकांनी सोडून दिलेली जनावरे काटेवाडी परिसरातील शेतांमध्ये धुडगूस घालत असताना आपल्या मित्रांच्या मदतीने ती जनावरे पकडून दूरवर सोडून देणारे तारणहार, स्वतःच्या शेतात राबून टोमॅटोचे विक्रमी उत्पादन घेणारा शेतकरी, स्वतःच्या गोठ्यांमध्ये गुरांना चारा पाणी घालून त्यांचे दूध काढणारा गोपाल, पोल्ट्रीच्या माध्यमातून शेतीपूरक व्यवसाय करता येतो हे दाखवून देणारा व्यावसायिक, रस्त्याने जातानाही आजूबाजूच्या झाडांवर लक्ष ठेवून त्यांची जपणूक करणारा निसर्गप्रेमी अशा अनेक रुपात दादांचे सर्वांगीण नेतृत्व तयार झाले.
एखादा व्यापक प्रश्न सोडवायचा असतो तेव्हा दादांनी कधीही राजकारण केले नाही, याची असंख्य उदाहरणे देता येतील. राज्याच्या राजकारणात मनाचा मोठेपणा ठेवून काम करणारा नेता अशी दादांची ओळख होती. आघाडी सरकारच्या काळात झोपडपट्टी प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाचा विषय प्रतिष्ठेचा न करता केवळ प्रश्न सुटला पाहिजे या भूमिकेवर पद सोडणारे दादा, विधिमंडळात अर्थ विधेयकावर चर्चा करण्यापूर्वी अधिकाऱ्यांच्या बैठकीत विरोधी पक्षनेता एकनाथ खडसेंना बोलावून ‘यांना तुमच्या सूचना सांगा आणि काही विधायक बदल असतील तर करुन घ्या’ असे सांगणारे दादा, राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर स्वतःच्या पक्षाच्या कोट्यातली जागा विरोधी पक्षाच्या पांडुरंग फुंडकरांना देणारे दादा, प्रशासकीय अधिकाऱ्यांचा नकार असतानाही सुधीर मुनगंटीवारांच्या मागणीवर त्यांच्या मतदारसंघातील एका प्रकल्पासाठी आपल्या सिंचन विभागातून १८० कोटी रुपयांची तरतूद करणारे दादा असे सर्वसमावेशक राजकारणाचे उदाहरण घालून देणारे दादा आपल्याला कधी समजूनच दिले नाहीत.
दादांची निर्णयक्षमता प्रचंड होती. लालमहालातील वादग्रस्त दादोजी कोंडदेव पुतळा काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर दादांवर प्रचंड टीका झाली, पण दादा शेवटपर्यंत खऱ्या इतिहासाच्या बाजूने ठामपणे उभे राहिले. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षकच होते, या भूमिकेसाठी ते विरोधकांच्या अनेक टीकांना सामोरे गेले. राज्याला महसुलाची गरज असतानाही तरुण पिढीच्या भवितव्यासाठी गुटखाबंदीचा धाडसी निर्णय दादांनीच घेतला. कबड्डी विश्वचषक जिंकणाऱ्या महिला संघाला १ कोटी रुपयांचे बक्षीस देण्याचा निर्णय असो किंवा कोरोनाच्या काळात आषाढी वारी पालखी सोहळा न काढता संतांच्या पादुका विमानाने पंढरपूरला नेण्याचा घेतलेला निर्णय असो, असे निर्णय हीच दादांच्या राजकीय प्रगल्भतेची ओळख होती.
अनेकदा दादांचा स्वभाव फटकळ असल्याचे बोलले गेले. पण दादांचा हा फटकळपणा निरागस होता. त्यामध्ये कधीही समोरच्याचे मन दुखावण्याचा हेतू नव्हता. जागेवरच एखाद्याचे काम होईल किंवा नाही हे त्याला सांगणे, याला फटकळपणा म्हणत नाहीत. समोरच्याला काम होईल आशेवर ठेवून नंतर त्याला कामासाठी हेलपाटे मारायला लावणे, हे त्यांना पटले नाही. बोलण्याच्या भरात आपल्याकडून चुकीने एखादा शब्द गेल्याची जाणीव झाल्यानंतर आत्मक्लेश करण्यातही दादांनी कमीपणा मानला नाही. ज्याचे मन मोठे असते, तीच व्यक्ती असे करू शकते.
अजितदादा समजून घेणे म्हणजे काय ? अजितदादा एक माणूस होते. माणूसपणाच्या मर्यादा त्यांनाही होत्या. पण या सगळ्या मर्यादांवर मात करत निर्व्यसनी, वक्तशीर, सत्यवचनी, उत्साही, प्रसंगी कठोर, लोकाभिमुख आणि कुटुंबवत्सल राहत आपले काम चोखपणे पार पाडत राहणे, ही दादांच्या व्यक्तिमत्वाची ओळख होती. दादांची दूरदृष्टी, काम करताना त्यांनी घेतलेले निर्णय, त्या निर्णयांचे लोकजीवनावर झालेले परिणाम, त्यामुळे झालेले बदल आणि त्यातून लोकांच्या विकासात झालेली वाढ या गोष्टीही समजून घेतल्या तर दादा समजतील.
राजकारणात ज्यांच्याकडे राजकीय डावपेचांबरोबर राजकीय सौहार्दताही असते, अशा नेत्यांपैकी अजितदादा पवार हे एक होते. सत्ता येते-जाते या गोष्टीचे त्यांनी कायम भान ठेवले. अशाच निवडणुकांच्या दौऱ्यात त्यांनी प्रचंड धावपळ केली. दादांची ही धावपळ सत्तेसाठी असली तरी, आपल्याला मिळालेली सत्ता ही जनतेची कामे करण्यासाठी वापरायची हाच त्यांचा पिंड राहिला आणि त्यातूनच त्यांनी ‘कामाचा माणूस’ ही ओळख सार्थ करून दाखवली.
अशाच निवडणूक दौऱ्यात धावपळ करत असताना एका दुर्दैवी क्षणी काळाने त्यांच्यावर घाला घातला. दादांच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी दादांच्या खांद्यावर पडली. त्यावेळी शरद पवार साहेबांनी त्यांच्यावर मायेचा हात ठेवून त्यांना राजकारणात पुढे आणले. नंतर दादांनी स्वतःच्या कर्तृत्वावर आपली वेगळी ओळख निर्माण केली. मागच्या काळात संपूर्ण पवार कुटुंब आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दरी निर्माण झालेली महाराष्ट्राने पाहिली; पण अलीकडेच ते संपूर्ण कुटुंब, ती सर्व नाती आणि त्यांचा राष्ट्रवादी पक्ष परिवार पुन्हा एकत्र येत असल्याचे पाहून महाराष्ट्र आनंदला होता. मात्र या आनंदवर विरजण पडले. आज शरद पवार साहेब, संपूर्ण पवार कुटुंब, समस्त बारामतीकर, दादांचे सर्वच क्षेत्रातील सहकारी, दादांचे कार्यकर्ते आणि त्यांच्यावर राजकारणापलीकडे प्रेम करणाऱ्या चाहत्यांसाठी एक अत्यंत दुःखद बातमी आली. कुणी अपेक्षाही केली नसेल, अशा बातमीने आजचा दिवस उजाडला. वेळ पाळणाऱ्या दादांनी अवेळी आपल्यातून एक्झिट घेतली. त्यांच्या पक्षाचे चिन्ह घड्याळ होते आणि विमान अपघातानंतर त्यांची ओळख घड्याळावरूनच करण्यात आली. बारामतीच्या मातीतील हा धुरंदर लोकनेता अखेर त्याच मातीत येऊन विसावला… तेही जनतेच्या सेवेचे काम करता करता!
राजकारण लय वंगाळ आहे. तुम्ही धंदा-पाणी करा, मस्तपैकी रहा, मुलांना चांगले शिकवा आणि निर्व्यसनी रहा.. हा त्यांचा संदेश वारंवार कानात घुमत आहे.
अजितदादा… महाराष्ट्र तुमचा कृतज्ञ राहील. तुमच्यासारखा नेता होणे नाही. भावपूर्ण श्रद्धांजली!







































