अजितदादा, राष्ट्रवादीला पालिकेत सत्ता मिळेलही, पण… थर्ड आय – अविनाश चिलेकर

0
667

जिकडे घुगऱ्या तिकडे उदोउदो, असा मानवी स्वभाव आहे. राजकारणही त्याला अपवाद नाही. २०१४ पासून मोदींची हवा सुरू झाली तसे काही मतलबी लोक `जय श्री राम` चा नारा देत भाजपामध्ये शिरले. गल्ली ते दिल्ली `हर हर मोदी घर घर मोदी`, चा जयजयकार होता. लोकसभा, विधानसभा गेली आणि २०१७ मध्ये पाहता पाहता पवार कंपनीच्या हातातील पिंपरी चिंचवड महापालिकासुध्दा भगवी झाली. वारे भाजपाच्या दिशेने वाहत होते म्हणून हौशे नौशे गौशे तिकडे पळाले. आता केंद्रात मोदी, पण राज्यात अजूनतरी पवार-ठाकरेंच आहेत. राज्यातील महाआघाडीचे सरकार डळमळीत आहे, पण ते पडत नाही असे दिसल्याने आता भाजपामध्ये गेलेले पुन्हा राष्ट्रवादीकडे स्वगृही परतण्याचा वेग वाढला आहे.

मतलबी मंडळींनी चाल ओळखली. शहरात आता भाजपाचे नाणे चालणार की नाही याची साशंकता वाटल्याने पाच वर्षांपूर्वी राष्ट्रवादीला भ्रष्ट्रवादी म्हणणारे आता भाजपाला नावे ठेवत आहेत. वारे राष्ट्रवादीच्या दिशेने वाहते याचे हे द्योतक. पाच वर्षांत भाजपाने काय दिवे लावले ते लोकांनीही पाहिले. वाढती महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी, धार्मिक तेढ, सामाजिक अस्वस्थता प्रचंड वाढल्याने जनमत आता भाजपाच्या विरोधात जात असल्याची जाणीव झाली. शहरातील अवैध बांधकामांचा प्रश्न, शास्तीकर माफी, रेडझोनची हद्द कमी करणे, २४ तास पाणी पुरवठा, नदी पुर्नविकास यापैकी एकही प्रश्न पाच वर्षांत सोडविता आलेला नाही. प्राधिकऱणाचे विलीनीकरण केले, मात्र मूळ शेतकऱ्यांना एकरी पाच गुंठे परतावा द्यायचा विषय तसाच कायम ठेवला. स्मार्ट सिटी च्या नावाखाली सरकार आणि करदात्यांचीही प्रचंड लूट केली. भ्रष्टाचाराला मूठमाती दणारेच नेतेच भ्रष्टाचारात आकंठ बुडाले. असा सगळा ननाचा पाढा सुरू झाल्याने भाजपाचे गलबत बुडणार याची खात्री झाली म्हणून इच्छुकांचा ओघ राष्ट्रवादीकडे लागला. यात एक टक्काही अतिशयोक्ती नाही. जी काही थोडीफार विकासकामे झालीत ती फक्त भोसरी परिसर आणि पिंपळे गुरव, सौदागर मध्येच दिसली. शहराचा ग्रामिण भाग आजही रस्ते, पाणा, शाळा, दवाखाने यासाठी आसूसलेला आहे. भाजपाचे हे अपयश आता लोकांना दिसते म्हणून मतदाराने तोंड फिरवले.

आमदार लक्ष्मण जगताप आता… 

अजित पवार यांच्या हातातील निर्विवाद सत्ता अक्षरशः खेचून घेणे हे येड्या गबाळ्याचे काम नाही. भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांनी ते करुन दाखवले. शहर एका उंचीवर नेऊन ठेवले, नावलौकीक झाला आणि अशाही परिस्थितीत लोकांनी भाजपाला मते दिल्याने अजित पवार पिंपरी चिंचवडकरांवर नाराज होते व अजूनही आहेत. दुर्दैव असे की आता आमदार जगताप यांची प्रकृती नाजूक आहे. देव करो त्यांना दिर्घ आयुष्य मिळो, पण पुन्हा पहिल्यासारखे ते मैदान गाजवतील याची कोणालाही शाश्वती नाही. आज आमदार महेश लांडगे यांच्याकडे भाजपाचे शहराध्यक्ष आहेत, पण शहरावर राज्य करायची त्यांची मानसिकता दिसत नाही आणि भोसरी बाहेर त्यांचेही लक्ष नाही. आमदार जगताप यांना शहराचे नेते म्हणत, आमदार लांडगे यांनी अजून ती उंची गाठलेली नाही. जगताप यांच्यासारखे कर्तृत्व लांडगे यांच्यालेखी दिसत नाही. भाजपाची धुरा त्यांच्या खांद्यावर आहे, पण चिंचवड, पिंपरीतील भाजपा नगरसेवकांना पुन्हा ते दिवस येतील याचा भरवसा वाटत नाही. आमदार जगताप यांना गल्लीबोळातील माणसे त्यांचे स्वभाव, त्यांची ताकद, आर्थिक क्षमता याची कुंडली तोंडपाठ होती, आता त्याची कमतरता जाणवते. लढाईत सेनापती घायाळ झाल्यावर सैन्याची जी अवस्था होते तीच गत आज भाजपाच्या संभाव्य इच्छुक उमेदवारांची झाली आहे. जो तो अजित पवार यांना भेटून येतो. आमदार जगताप यांचे खंदे समर्थक समजले जाणारे हुकमी एक्का असलेले माजी नगरसेवक नवनाथ जगताप यांनी राष्ट्रवादीचा मार्ग स्वीकारला. असे भाजपाचे तोडीस तोड असलेले आणखी ४२ माजी नगरसेवक राष्ट्रवादीच्या गळाला लागलेत. जी संभाव्य नावे आहेत ते नेते पूर्ण पॅनल निवडूण आणतील अशा ताकदीचे आहेत. भाजपाने या मंडळींना रोखून धरण्यासाठी जोर बैठका सुरू केल्यात. ते सांगतील त्यांना उमेदवारी, त्यांचा निवडणूक खर्च आणि आगामी काळात पदे देण्याचे आश्वासन देऊनही कोणी थांबायला तयार नाही. एकदा घर म्हणा की गृह फिरले की घराचे वासेही फिरतात अगदी तसे झाले. अजून निवडणूक कार्यक्रम जाहिर व्हायचा आहे, तोच ही परिस्थिती आहे.

अजित पवार यांनी जातीने लक्ष घातले तर –
उपमुख्यमंत्री म्हणून स्वतः अजित पवार अद्याप म्हणावे असे लक्ष देत नाहीत. आता भाजपाने कितीही अडथळे आणले, ईडी-सीबीआयचे छापे टाकून दबाव आणला तरी या शहरात राष्ट्रवादीची सत्ता येण्यापासून कोणी रोखू शकत नाही हे अगदी स्पष्ट आहे. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत. ठाकरे यांना मुंबईची सत्ता काही करून कायम ठेवायची आणि पवार यांनी पुणे व पिंपरी चिंचवड पुन्हा खेचून घ्यायची आहे. ईडी, सीबीआय, जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरण लक्षात घेतले तर स्वतः अजित पवार हे आजही काहीसे भाजपाच्या दबावाखाली आहेत. शक्यतोवर ते भाजपा किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यावर टोकाची टीका करत नाहीत. शहराचे प्रश्न फडणवीस यांनी सोडविले नाही, पण आता अडिच वर्षे दादा उपमुख्यमंत्री आहेत. शहरातील अवैध बांधकामे, शास्तीसारखे प्रश्न ते सहज सोडवू शकतात. लोकांना आता त्यांच्याकडूनच अपेक्षा आहे. पंधरा दिवसांपूर्वी विधीमंडळ अंदाज समितीने महापालिकेला भेट दिली आणि कारभाराचे वाभाडे काढले. पाणी, पवना प्रदुषण, रस्ते खोदाई, सीसी टीव्ही, स्मार्ट सिटी, रस्ते व सफाई निविदा, कोरोना काळातील स्पर्ष घोटाळा, मास्क खरेदी, कुत्र्यांचे निर्बिजीकऱण, टीडीआर, मोशी कचरा डेपो आग अशा जवळपास १७ विषयांवर समिती सदस्यांनी जाब विचारला. खरे तर, या सगळ्या प्रकरणांत संबंधीत दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. तीन दिवस अंदाज समिती सदस्यांनी तावातावाने सगळ्या प्रकरणांवर आगपाखड केली, पण नंतर समितीचे समाधान झाले अशी वदंता आहे. समिती निःपक्षपातीपणे काम करते असा समज होता व आजही आहे. इथे चोरावर मोर असा प्रकार काहिसा प्रकार झाल्याची चर्चा आहे. अजितदादा, भाजपाच्या भ्रष्टाचारावर पांघरुन घालायचे काम महाआघाडीचे सरकार कऱणार असेल तर काळ या राज्य सरकारलाही माफ करणार नाही. भाजपाने इथे भरपूर भ्रष्टाचार केला असा आरोप करताना राज्य सरकार शिवसेना राष्ट्रवादीचे आहे, त्यांनी आजवर एकाही प्रकरणाची चौकशी का नाही लावली, असा सामान्य लोकांचा रोकडा सवाल आहे. आम्ही दोघे भाऊ भाऊ असे चालणार असेल तर ती जनतेची फसवणूक होईल. राष्ट्रवादीला खरोखर सत्ता हवी असेल तर भ्रष्टाचारमुक्त कारभाराची हमी द्यावी लागेल. अजितदादा, तुम्ही थोडे मनावर घेतलेत तर लक्ष्य दूर नाही. पिंपरी चिंचवडकर जनतेची ससेहोलपट थांबवा. निवडणुकिसाठी प्रभागरचना, आरक्षण सोडत सर्व कसे राष्ट्रवादीच्या पथ्यावर आहे. सत्ता मिळेल, पण सामान्य करदात्यांचा विश्वास संपादन करा. भ्रष्टाचाऱ्यांना घरी बसवा, लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील …