राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी
पुन्हा महापालिका ताब्यात घेण्याची सुवर्ण संधी आहे. आमदार अण्णा बनसोडे यांना विधानसभा उपाध्यक्ष पद देण्यामागे तेच एकमेव कारण दिसते. मात्र, आतापासून मोर्चेबांधनी करावी लागेल. २०१७ मध्ये अजित पवार यांच्या तोंडचा घास काढून घेतला. मावळ लोकसभेला दादांचे पूत्र पार्थ यांचा अतिशय वाईट पराभव झाला. दोन्ही पराभवाची कारणे अनेक आहेत. महापालिकेतील भ्रष्टाचाराची अनेक प्रकऱणे भाजपने वाजवली आणि गाजवली. १४५० ची विठ्ठल रुक्मिनी मूर्ती ३९५० ला खरेदी केल्याचे एकच प्रकरण भोवले. शेकडो प्रकरणे होती, पण देवाच्या खरेदीतही भ्रष्टाचार अंगलट आला. राष्ट्रवादीने देवसुध्दा सोडला नाही, हे भाजपने लोकांच्या मनावर बिंबवले. राष्ट्रवादी नव्हे भ्रष्टवादी पक्ष अशी ख्याती झाली आणि तिथेच जनमत फिरले. २०१९ मध्ये मावळ लोकसभेला दादांना वाटले आपण मैदान मारू. ज्यांना पदे दिलीत ते काम करतील असा भोळा आशावाद ठेवला आणि तिथेच गाडी फसली. शरद पवार, अजित पवार आता तिसऱ्या पिढीची गुलामी करायची काय, असे म्हणत स्थानिक मंडळींची अस्मिता जागी झाली आणि सर्व गावकीने पार्थ पवार यांचा पध्दतशीर कार्यक्रम केला. तेव्हापासून दादा शहराशी फटकून राहिले. त्याचाच फायदा फडणवीस यांनी घेतला आणि भाजपची पाळेमुळे घट्ट केली.
भाजपची अवाढव्य ताकद, पण… –
मोदी-फडणवीस ही दोन चलनी नाणी भाजपकडे आहेत.
दोन विधानसभेचे, दोन परिषदेचे मिळून चार आमदार, ७७ माजी नगरसेवक, महामंडळांचे तीन माजी पदाधिकारी, दोन लाखांवर पक्षाचे सभासद, निष्ठावंतांची फौज, हिदुत्ववादी संघटना, रा.स्व.संघाचे भक्कम पाठबळ आणि सर्वात मोठी ताकद म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फढणवीस यांची साथ. भाजपची ही सर्वात मोठी जमेची बाजू आहे. फडणवीस यांनी शहरासाठी पोलिस आयुक्तालय, न्यायालय इमारत, पाणी प्रश्नावर तत्काळ निर्णय केले. आमदार महेश लांडगे आणि जगताप कुटुंबाच्या मागे फडणवीस खंबीरपणे उभे राहिले. उमा खापरे आणि अमित गोरखे यांच्या सारख्या निष्ठावंतांना आमदार केले. मुंडे समर्थक अमर साबळेंना रात्रीतून राज्यसभा खासदार केले. मुंडेंचे उजवे हाथ असलेल्या सदाशिव खाडेंना प्रचंड विरोध असतानाही प्राधिकण अध्यक्ष केले. एड. सचिन पटवर्धन यांना राज्य लोकलेखा समिती अध्यक्षपद दिले. अमित गोरखे यांना अण्णा भाऊ साठे महामंडळ दिले. अनुप मोरे यांना माथआडी मंडळ आणि आता प्रदेश युवक अध्यक्ष केले. भाजपने पिंपरी चिंचवडमध्ये इतके भरभरून दिले आणि तेही अवघ्या आठ-दहा वर्षांत. परिसराची आणि कार्यकर्त्यांची प्रगती व्हायची तर सत्तेची कास धरली पाहिजे हे सूत्र शरद पवार यांचे आहे. शहरातील तमाम पवार प्रेमी तेच उराशी बाळगून भाजपच्या मागे गेले आणि सर्वांनी प्रगती केली. गल्ली ते दिल्ली भाजप पुढची दहा-वीस वर्षे हालत नाही, असा विश्वास असल्याने कार्यकर्त्यांचे मोहळ आपसूक भाजपकडे गेले. उद्या महापालिका निवडणूक झालीच तर भाजपकडे १२८ जागांसाठी तोडस तोड असे प्रत्येक ठिकाणी तीन-चार उमेदवार असतील. आता हा सगळा खेळ अजित पवार कसा काय उधळणार हा प्रश्न आहे.
दादा, सत्तेत यायचेच तर हे करा… –
होय, राखेतून फिनिक्स पक्षाची भरारी घेणाऱ्या शरद पवार यांच्या तालमित अजितदादा घडलेत. मनात आणलेच तर भाजपच्या मदमस्त हत्तीला लोळवणे त्यांनी सहज शक्य आहे. फक्त मनाची तयारी पाहिजे. राज्यातील महायुतीत दादा सत्तेचे भागीदार आहेत. सर्वजण स्वतंत्र लढणार असल्याचे दादा अधून मधून सांगत असतात. महायुती म्हणून लढले तर राष्ट्रवादीच्या वाट्याला इनमिन ३०-४० सुध्दा जागा येणार नाहीत आणि स्वतंत्र लढले तर मैदान मोकळेच आहे. फक्त एक खूनगाठ मनाशी बाळगली पाहिजे. प्रेमात आणि राजकारणात सर्व क्षम्य असते. महाभारता प्रमाणे पाच पांडव दादांकडे आहेत आणि समोर भाजपकडे कौरवांची फौज आहे. लढाई करायचीच तर भाजप बरोबर दोन हात करावे लागतील तिथेच अजित पवारांची परिक्षा आहे. २०१७ पासून २०२२ पर्यंत भाजपचीच राजवट होती. नंतरच्या प्रशासकीय राजवटीतील तीन वर्षेसुध्दा भाजपच्याच आशिर्वादाने आहेत. या आठ वर्षांत शेकडो भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आलीत. एका विठ्ठल रुक्मिनी मूर्ती खरेदीने राष्ट्रवादीची सत्ता गेली. आज त्यापेक्षा हजार पटीने मोठा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले. अजितदादांच्या राष्ट्रवादीतील एकाही नेत्याने आजवर एकाही प्रकरणात हात घातला नाही. सत्ता पाहिजे तर भाजपला कोंडीत पकडले पाहिजे. २९ कोटींचा पूल ३९ कोटींना होतो. उड्डाण पुलांच्या सुशोभिकरणावर कोट्यवधींची उधळपट्टी होते. अर्बन स्ट्रिट फूटपाथ ३६ कोटी प्रति किलोमीटरने होतो तर सव्वा किलोमीटरच्या रस्त्यासाठी ८२ कोटींची निविदा मंजूर होते. किमान शे-दीडशे प्रकरणे आहेत. खर्च न करताच प्रभाग कार्यालयांतून दर वर्षी किमान २५-३० कोटींची कामे झालीत. चौकशी एकाचीही झालेली नाही आणि दादांच्या राष्ट्रवादीनेही तिकडे धुंकून पाहिलेले नाही. लढायचे तर दारुगोळा पाहिजे असतो, तो प्रचंड आहे. फक्त तोफ डागली पाहिजे आणि ती हिंमत दादांच्या राष्ट्रवादीने दाखवली पाहिजे. भाजपचे अवघ्या २-४ नगरसेवकांचे ७७ नगरसेवक होतात कारण त्यांची मेहनत. दादांच्या राष्ट्रवादीची ती तयारी पाहिजे. एक आमदार अण्णा बनसोडे यांना विधानसभा उपाध्यक्षपद दिले हे चांगले केले. अशी किमान आणखी तीन-चार महामंडळे शहरात दिली पाहिजेत. अजित गव्हाणे, संजोग वाघेरे यांच्यासारखे तोडीस तोड असे संपूर्ण पॅनल निवडूण आणू शकतात असे नेते दादांकडे तोंड करून बसलेत, ते परत आणले पाहिजेत. पक्ष सोडून गेलेले ३०-४० नगरसेवक हे ताकदिचे होते. आता त्यांची मोट बांधली आणि जुने-नवे एक करून तोफांचा भडिमार केला तर कुठे मैदान मारता येईल.