अजितदादा चिंचवडमधून लढणार ?

0
128

भाजपमध्ये अस्वस्थता, राष्ट्रवादीत आनंदाचे भरते

दि. 16 ऑगस्ट (पीसीबी) – आजवर मी ७ – ८ निवडणुका लढलोय, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बारामती विधानसभेसाठी रिंगणात उतरणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिल्याने राज्याच्या राजकारणात आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. दादांनी लढाईपूर्वीच तलवार म्यान केल्याची टीका होऊ लागली आहे, तर सल्लागार कंपनीच्या सांगण्यानुसार दादांनी हा स्टॅंड घेतल्याचे कार्यकर्ते सांगतात.

दरम्यान, आता यावेळी अजितदादा त्यांचे आवडते शहर म्हणून पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड विधानसभा मतदारसंघातून लढण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे. या मतदारसंघावर दावा असणाऱ्या भाजपमध्ये अस्वस्थता वाढली असून गळपटलल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चैतन्य संचारले आहे.बारामती लोकसभेला बहिण सुप्रिया सुळे यांच्या विरोधात स्वतःच्या पत्नी सुनेत्रा यांनी उभे करायला नको होते, ती माझीच चूक होती, असे जाहीरपणे खुद्द दादांनीच म्हटल्याने ते किती हतबल आहेत याचेच दर्शन झाले. दादांनी घाबरून पळ काढल्याची टीका सुरू झाली आहे. विरोधकांनी ती संधी साधत आता अजितदादांवर निशाना टीका सुरू केली आहे. दादांच्या भगिनी स्वतः खासदार सुप्रिया सुळे, पुतणे आमदार रोहित पवार तसेच अन्य नेत्यांनीही अजितदादांवर टीकेचा भडिमार सुरू केल्याने राजकारण ढवळून निघाले आहे.

बारामती विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून युगेंद्र पवार यांनी आजोबांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार तयारी सुरू केली आहे. अजितदादांचा पराभव करणारच असा दृढनिश्चय साहेबांच्या राष्ट्रवादीने केल्याने दादांच्या कंपूत घरबाट उडाली. आता तिथे दादा लढणार नाहीत, अशा बातम्या होत्या. अशातच अजितदादांचे चिरंजीवर जय पवार यांना लॉन्च करण्यात आले आणि तेच रिंगणात उतरणार असल्याचे संकेत मिळाले. बारामतीतून अजितदादा लढणार नाहीत, असे सगळे सांगत असताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कार्याध्यक्ष प्रफूल्ल पटेल यांनी, दादा विधानसभेत असणार, असे अगदी निक्षून सांगितले.

आता दादा नेमके कुठून लढणार यावर राळ उठली आहे. बारामती नंतर अजितदादांची पहिली पसंती पिंपरी चिंचवड शहर आहे. मुळात गेल्या २२ वर्षांत दादांची इथे एकहाती सत्ता होती. २०१७ मध्ये दादांचेच काही शिलेदार फितूर झाले आणि भाजपला जाऊन मिळाले म्हणून महापालिकेतील सत्ता गेली. आता महायुती असल्याने भाजप आणि दादांची राष्ट्रवादी एकत्र आहेत. विधानसभेला आम्ही एकत्र लढणार आणि पुढे महापालिका, जिल्हा परिषदेला स्वतंत्र लढणार असे स्वतः अजितदादांनी यापूर्वीच सांगितले आहे. आता पिंपरी चिंचवड शहर पुन्हा ताब्यात घेण्यासाठी दादा चिंचवड विधानसभेसाठी रिंगणात उतरणार असे म्हणतात. मावळ लोकसभा मतदारसंघातून २०१९ मध्ये पार्थ पवार यांचा पराभव दादांच्या जिव्हारी लागला होता. नंतरच्या काळातही दादा शहरातील विकासाकामे तसेच कार्यकर्ते, नेते यांच्याशी संवाध साधत राहिले. स्वतः अजितदादाच इथे उमेदवार असतील तर संपूर्ण राष्ट्रवादी झोकून देत काम करेल आणि पुढची महापालिका जिंकणे अधिक सोपे होईल, अशी अटकळ आहे. २०२५ मध्ये महायुतीचे घटक म्हणून महापालिका एकट्या भाजपला किंवा एकट्या राष्ट्रवादीलाही जिंकणे सोपे नाही. न पेक्षा अजितदादांनी चिंचवडची आमदारकी लढवली तर भाजपचाही कायमचा बिमोड शक्य होईल आणि पुन्हा महापालिकाही ताब्यात मिळेल, असे कार्यकर्त्यांना वाटते.

चिंचवडमध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी अश्विनीताई या गेली दोन वर्षे आमदार आहेत. आता २०२४ मध्ये पुन्हा आपल्यालाच संधी मिळावी म्हणून त्यांचे जोरदार प्रयत्न आहेत. दरम्यान, त्यांचे सख्खे पुतणे आणि भाजपचे शहराध्यक्ष शंकरशेठ जगताप यांनी तयारी सुरू केल्याने दीर भाऊजय वाद वाढला आहे. शंकरशेठ जगतपा सोडून कोणालाही संधी द्या, अशी मागणी भाजपचे नगरसेवक शत्रुघ्न काटे, चंद्रकांत नखाते यांच्यासह १५ माजी नगरसेवकांनी केली आहे. दुसरीकडे जगताप कुटुंबातील कोणालाही नको, नवखा चेहरा द्या, अशी मागणी भाजमध्ये जोर धरू लागली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाऊसाहेब भोईर, नाना काटे, शिवसेनेतून राहुल कलाटे यांची नावे चर्चेत आहेत. अशातच थेट अजितदादा महायुतीचे उमेदवार लढणार असल्याचा बॉम्बगोळा फुटल्याने सगळेच हबकले आहेत. लोकसभा निवडणुकित शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी हॅट्रिक केली, पण हा विजय राष्ट्रवादीने काम केल्याने मिळाल्याचा दावा दादांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी पत्रकारांशी बोलताना केला. बारणे यांना महायुती म्हणून चिंचवड विधानसभेतून तब्बल ७७ हजारांचे मताधिक्य मिळाले. त्यापूर्वी विधानसभा पोटनिवडणुकित राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांनी ९९ हजार आणि अपक्ष राहुल कलाटे यांना ४४ हजार मते होती. भाजपच्या अश्विनीताई अवघ्या ३६ हजारांनी जिंकल्या. भाजप विरोधातील मतांची गोळाबेरिज केली तरी राष्ट्रवादी स्वतःच्या बळावरसुध्दा आरामात जिंकू शकते, अशी खात्री पटल्याने अजितदादांसाठी चिंचवड सोपा आणि अत्यंत महत्वाचा मतदारसंघ असेल.