श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सातुर्डेकर यांनी जागवल्या आठवणी
दि.१०(पीसीबी)-मी पिंपरी चिंचवड श्रमिक पत्रकार संघाचा अध्यक्ष असताना पत्रकार संघ व प्राधिकरणातील चक्रव्यूह मित्र मंडळाचे अध्यक्ष बाळा शिंदे यांच्या पुढाकाराने बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या विद्यानगरीस भेट देण्यासाठी पत्रकारांच्या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिष्ठानचे निबंधक निवृत्त लेफ्टनंट कर्नल ए. पी. मुखोपाध्याय यांना पत्रकारांना योग्य ती माहिती द्या, त्यांची योग्य ती बडदास्त ठेवा. असे आदेश दिले होते. त्यामुळे पत्रकारांना प्रतिष्ठान विषयी बारकाईने माहिती जाणून घेता आली. अशी आठवण पिंपरी चिंचवड श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष नंदकुमार सातुर्डेकर यांनी जागवली.
याबाबत सातुर्डेकर म्हणाले की, दि. 31 मार्च 2008 रोजी पिंपरी चिंचवड श्रमिक पत्रकार संघ व प्राधिकरणातील चक्रव्यूह मित्र मंडळातर्फे बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या विद्यानगरीला भेट देण्यासाठी पत्रकारांच्या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘सन 1993 मध्ये सुरू झालेल्या या शिक्षण संस्थेचा आज वटवृक्ष झाला आहे. बारामती व पंचक्रोशीतील ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक व दर्जेदार शिक्षण दिले जात आहे या शैक्षणिक संकुलात 12000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत 2200 विद्यार्थ्यांना वसतीगृहाची सोय आहे.केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, पालकमंत्री अजित पवार हे जातीने लक्ष देत असून संस्थेच्या कामकाजाचा ते नियमित आढावा घेतात ‘अशी माहिती आम्हाला देण्यात आली होती. प्रतिष्ठानला भेट दिल्यानंतर ते जाणवतही होते. यावेळी पत्रकारांनी कृषी मंत्री शरद पवार यांना गेल्या 40 वर्षात मिळालेल्या भेटवस्तू व दुर्मिळ छायाचित्रांच्या जतन वस्तू संग्रहालयासही भेट दिली होती. या दौऱ्याच्या निमित्त ज्येष्ठ नेते शरद पवार व दिवंगत उपमुख्यमंत्री यांनी बारामतीचा केलेला विकास श्रमिक पत्रकारांना जाणून घेता आला जवळून पाहता आला असे सातुर्डेकर म्हणाले.









































