अजितदादांना शिरूर लोकसभेच्या जागेवर हक्क सांगता येणार नाही – शिवाजीराव आढळराव पाटील

0
272

पुणे, दि. १९ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुका जवळ आल्या असल्या तरी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये लोकसभा जागावाटपाचे सूत्र अद्यापही ठरलेलं नाही. कोणती जागा कोण लढणार, याबाबत अजून स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे सर्व जागांवरती सर्वच पक्ष आपला दावा सांगत आहेत. यामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघात एकीकडे महाविकास आघाडीकडून अमोल कोल्हे निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित असलं तरी महायुतीकडून मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये या जागेसाठी रस्सीखेच सुरू आहे.

या जागेवरती आपला दावा कशाप्रकारे मजबूत आहे हे सांगण्याचं काम दोन्हीही गटांकडून करण्यात येत आहे. यापूर्वी अजित पवार यांनी आपण शिरूरमध्ये उमेदवार देणार आणि निवडून आणणार असं चॅलेंज अमोल कोल्हे यांना दिलं आहे. त्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीचा या मतदारसंघावर दावाच होऊ शकत नाही, असं सांगत आपणच ही निवडणूक लढणार आणि जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

हडपसर येथे सेना केसरीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आढळराव पाटील यांनी भेट दिली, त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आढळराव पाटील म्हणाले म्हाडाचे अध्यक्षपद मला मिळणं आणि लोकसभेची उमेदवारी याचा एकमेकांशी काही संबंध नाही. त्यामुळे काही लोकांना माझा लोकसभेचा पत्ता कट झालाय, असं वाटतंय त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गेल्या दीड वर्षापासून एखादं पद मला मिळावं, यासाठी आग्रही होते. आठ महिन्यांपूर्वी म्हाडाचे पद मला देण्याबाबत प्रशासकीय प्रक्रिया सुरू होती. त्यासाठी मी कोणताही पाठपुरावा केला नाही. दोन दिवसांपूर्वी त्याची प्रक्रिया पूर्ण होऊन मला ते पद मिळालं आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अमोल कोल्हे यांनी तयारी सुरू केली असून, आढळराव पाटील कुठेतरी मागे पडलेत का? असं विचारलं असता आढळराव पाटील म्हणाले, ‘लोकसभेची उमेदवारी मी कधीही सोडली नव्हती. लोकसभेसाठी मी फार पूर्वीपासून तयारी करत आहे. तुम्हाला टीव्हीवर जरी अमोल कोल्हे दिसत असले तरी मी जमिनीवरती उतरून काम करत आहे. गेली पाच वर्षे मी रोज 12 गावे फिरत असून, पूर्ण ताकदीने कामाला लागलो आहे.’

शिरूरच्या जागेवरती राष्ट्रवादीने आपला दावा सांगितला असेल. मात्र, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला न थांबता लोकसभेच्या तयारीचे काम सुरू ठेवण्यास सांगितले आहे. पूर्वी ही जागा राष्ट्रवादीने लढवलेली असली तरी सध्या विजयी झालेला उमेदवार त्यांच्याकडे नाही. तो उमेदवार शरद पवार गटाकडे आणि महाविकास आघाडीकडे आहे. तो उमेदवार जर अजित पवारांकडे असता तर शिरूर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या दाव्याला अर्थ आला असता. मात्र, आता एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आम्ही शिरूरची जागा ताकदीने लढणार आहोत. मी महायुतीचा उमेदवार असून, नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी सर्व पक्ष काम करतील आणि मी निवडून येईन, असा विश्वास आढळराव यांनी व्यक्त केला.

‘मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावरती लोकसभेची निवडणूक लढवणार आहे, या निव्वळ चर्चा आहेत. याबाबत अद्याप आमच्यात कोणतीही बोलणी झालेली नाहीत, त्यामुळे या चर्चा तथ्यहीन असल्याचे’ आढळराव पाटील यांनी सांगितले. मागच्या निवडणुकींमध्ये माझा पराभव झाला. लोक भूलथापांना बळी पडले. मात्र, पाच वर्षांमध्ये अमोल कोल्हे यांनी कोणती मोठी कामे केली हे दाखवावे, असे चॅलेंज आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हेंना दिले.