अजितदादांना कायमचे घरी बसविण्याची शरद पवार यांची खेळी

0
79

बारामती, दि. 05 (पीसीबी) : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सोमवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या लढतीचं चित्र स्पष्ट झालं आहे. राज्यात सध्या सर्वाधिक चर्चेमध्ये कोणता विधानसभा मतदारसंघ असेल तर तो म्हणजे बारामती विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून स्वत: अजित पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच पवार कुटुंबातील दोन सदस्य आमने-सामने असल्यानं संपूर्ण राज्याचं लक्ष या लढतीकडे लागलं आहे.

दुसरीकडे लोकसभेला देखील पवार कुटुंबातील दोन सदस्य आमने-सामने होते, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये लढत झाली. या हायहोल्टेज लढतीमध्ये सुप्रिया सुळे या विजयी झाल्या, तर यावेळी युगेंद्र पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये लढत होणार आहे. राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीनंतर शरद पवार स्वत: मैदानात उतरले आहेत. त्यामुळे बारामती विधानसभेची निवडणूक म्हणावी इतकी अजित पवार यांच्यासाठी सोपी नसणार आहे.

शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी एक सभा घेतली. या सभेत बोलताना त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. अजित पवार यांनी आता वीस ते पंचवीस वर्ष काम केलं. त्यामुळे आता पुढे तीस वर्ष काम करू शकेल असं नेतृत्व आपल्याला तयार करायचं आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांच्या या वक्तव्याचे अनेक अर्थ लावले जात आहेत.
पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्याच्या चेहरा बदलला पाहिजे, लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे. त्यासाठी नवीन पिढी तयार केली पाहिजे, त्यासाठी आता आम्ही लक्ष घातलं आहे, बारामतीमधून युगेंद्र यांना संधी दिली. राज्यात अनेक ठिकाणी तरुण नेतृत्वाला संधी देण्यात आली आहे. राज्यात तरुण नेतृत्वाची फळी उभी करण्याचा संकल्प आम्ही केला आहे, त्यासाठी तुमची मदत पाहिजे, असंही यावेळी शरद पवार म्हणाले.