– प्रशांत शितोळे, मयूर कलाटे, मोरेश्वर भोंडवे, विनोद नढे, संतोष कोकणे आदी माजी नगरसेवकसुध्दा रामराम कऱणार
– पिंपरी, दि. ३० : लोकसभेला शिरुरमधून उमेदवारी नाकारल्याने नाराज असलेले भोसरीचे माजी आमदार विलास लांडे हे अजित पवारांची साथ सोडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लांडे यांनी पुण्यातील मोदीबागेत शरद पवार यांची मंगळवारी (१० सप्टेंबर) भेट घेतल्याने लांडे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी नगरसेवक मयूर कलाटे, मोरेश्वर भोंडवे, विनोद नढे, संतोष कोकणे आदी पाच नगरसेवकांनी लांडे यांच्या समवेत शरद पवार यांची भेट घेतली.
तत्कालीन हवेली विधानसभा मतदारसंघ आणि भोसरी विधानसभा मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या माजी आमदार लांडे यांना सलग दोन वेळा भोसरीतून पराभव पत्करावा लागला आहे. भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी त्यांना पराभूत केले. राष्ट्रवादीतील फुटीनंतर लांडे यांनी अजित पवारांसोबत जाणे पसंत केले. त्यांनी लोकसभेला शिरूरमधून उमेदवारी मागितली. ‘मला उमेदवारी देत नसाल, तर आयात उमेदवार देऊ नका. महेश लांडगे यांना उमेदवारी द्यावी. त्यांचे काम करायला मी तयार आहे’ असे वक्तव्य त्यांनी केले होते. मात्र, अजित पवार यांनी लांडे यांची मागणी फेटाळली. माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन उमेदवारी दिल्याने लांडे नाराज झाले. ज्या पक्षाचा विद्यमान आमदार, त्या पक्षाला मतदारसंघ या महायुतीच्या सूत्रामुळे विधानसभेलाही संधी मिळणार नसल्याने लांडे यांची अडचण झाली आहे.
विधानसभेसाठी इच्छुक असलेले त्यांचे जवळचे नातलग राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. लांडे यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही निर्णय घेतला असून ते आमच्यासोबत असल्याचे गव्हाणे यांनी स्पष्ट केले होते. मात्र लांडे यांनी सावध भूमिका घेतली होती. त्यांनी दुसऱ्याच दिवशी अजित पवारांच्या बैठकीला हजेरी लावली. त्यामुळे लांडे यांच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाला असतानाच त्यांनी शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेच्या सभास्थळाचा आढावा घेतला होता. मात्र, ते सभेला गैरहजर राहिले होते. त्यांच्या पत्नी माजी महापौर मोहिनी लांडे या सभेच्या व्यासपीठावर उपस्थित होत्या. तेव्हापासून लांडे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची चर्चा सुरू झाली आहे. लांडे यांनी सोमवारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची, तर मंगळवारी शरद पवार यांची पुण्यात भेट घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, लांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत बोलण्यात नकार दर्शविला. मात्र भेट झाल्याचे त्यांनी नाकारले नाही.