सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. या प्रचारात महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये राजकीय द्वंद्व रंगले आहे. मात्र, मावळ लोकसभा मतदारसंघात सध्या एक वेगळेच चित्र पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना संजोग वाघेरे यांनी यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अनेक महत्त्वाची पदं भुषविली होती. परंतु, आता ते ठाकरे गटाचे उमेदवार असल्याने महायुती आणि पर्यायाने अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांचा विरोधक आहे. मात्र, संजोग वाघेरे यांची जुन्या पक्षाशी असलेली नाळ अद्याप तुटलेली नाही. मावळ लोकसभेच्या निवडणुकीत संजोग वाघेरे यांना या गोष्टीचा फायदा होण्याची शक्यता आहे. संजोग वाघेरे यांनी स्वत: अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते अजूनही आपल्या संपर्कात असल्याची कबुली दिली आहे.
संजोग वाघेरे यांनी बुधवारी ‘एबीपी माझा’शी संवाद साधला. अजित पवार यांनी मावळ लोकसभेतील मविआचे उमेदवार संजोग वाघरेंना भेटू नका, अशी तंबी कार्यकर्त्यांना दिली आहे. मात्र, तरीही राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते संजोग वाघेरे यांना भेटत आहेत.
अजित पवारांची राष्ट्रवादी मविआचा प्रचार करते? मविआ उमेदवाराच्या उत्तराने संभ्रम वाढला.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील हेच मित्र आणि नातेवाईक तुमचा प्रचार करतायेत का? असा प्रश्न विचारला असता वाघरेंनी संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य केले आहे. अजित पवार गटातील मित्र आणि नातेवाईक प्रत्येकाच्या भेटीगाठी होतच असतात. जिथे जाईल तिकडे अनेकजण भेटत असतात, असे वाघेरे यांनी म्हटले. त्यामुळे अजित पवारांची राष्ट्रवादी मावळ लोकसभेत महायुतीचा प्रचार करणार की महाविकासआघाडीचा असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. संजोग वाघेरे यांना याबाबत विचारले असता त्यांनी म्हटले की, अजित पवार गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मला भेटत असले तरी ते कोणाचे काम करतील, हा त्यांचा प्रश्न आहे, अशी कोड्यात टाकणारी भूमिका वाघेरे यांनी घेतली.
23 तारखेला उमेदवारी अर्ज भरणार, मविआतील सगळे नेते येतील: संजोग वाघेरे
संजोग वाघेरे मावळ लोकसभेत फक्त ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनाच घेऊन प्रचार करत असल्याचे चित्र आहे. शरद पवार गटाकडून त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याची चर्चा आहे. याविषयी विचारले असता वाघेरे यांनी म्हटले की, सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरु असल्याने शरद पवार गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिरुर आणि बारामतीमध्ये आहेत. यापूर्वी आम्ही अनेक बैठका एकत्र घेतल्या आणि फिरलो. आता 23 एप्रिलला मी उमेदवारी अर्ज भरताना मविआचे प्रमुख नेते उपस्थित राहतील, असा दावा संजोग वाघेरे यांनी केला.