अजितदादांचे चिरंजीव पार्थ आणि जय पवार मैदानात

0
688

पुणे, दि. १९ (पीसीबी) – शिंदे -फडणवीस सरकारमधील नवे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे होमपिच म्हणजे पुणे आणि पिपंरी चिंचवड ही दोन्ही शहरे. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर अजितदादांची या शहरांवरील पकड सैल झाली होती. पण सत्तेत सामील झाल्यानंतर याच शहरांमधील ताकद वाढवण्यासाठी त्यांचे दोन्ही चिरंजीव मैदानात उतरले आहेत. २०१९ मध्ये पार्थ पवार यांना मावळ लोकसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने पराभव झाला होता. आता पुन्हा नव्या दमाने ते रिंगणात उतरले आहेत. अजित पवार यांच्या पहिल्याच सभेत जय पवार हे त्यांच्या मागे सावलीसारखे उभे होते, तेव्हाच तेसुध्दा मैदानात उतरणार हे लक्षात आले.

अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बालेवाडी येथील क्रिडा संकूलात आयोजित कबड्डी स्पर्धेचे पार्थ आणि जय पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या माध्यमातून पार्थ आणि जय पवार दोघेही पुण्याच्या राजकारणात सक्रीय होत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे राज्यातील राजकारणाची समीकऱणेही तितकीच झपाट्याने बदलली. सत्तेत सामील होताच अजित दादांना उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थखातं देण्यात आले. वडिलांची ताकद वाढवण्यासाठी आणि राजकारणात पार्थ आणि जय पवार यांनीही पाय रोवण्यास सुरूवात केली आहे.

२०१९ मध्ये पार्थ पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली. मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर पिंपरी-चिंचवड आणि मावळ लोकसभा मतदारसंघात काही कार्यक्रमातही पार्थ पवार उपस्थित होते. पण त्यानंतर ते सक्रिय राजकारणातून अगदीच बाजूला झाले.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडानंतर केल्यानंतर अजित पवारांनी मुंबईत समर्थक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. त्यावेळी जय पवार अजित पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचेही दिसून आले. पार्थ आणि जय पवार हे दोघे पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर दिसले. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने बालेवाडी येथील क्रीडा संकुलात आयोजित कबड्डी स्पर्धेचे उद्घाटनही पार्थ आणि जय पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेच्या निमित्ताने दोघांनीही जनसंपर्क वाढविण्यास सुरुवात केली आहे.