स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी संघटन बळकटीसाठी सुनील तटकरे यांचा सर्वेक्षण व प्रचार मोहिमांसाठी पाठिंबा
दि.०३(पीसीबी)-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत पक्षाच्या जिल्हा व तालुका समित्यांसोबत मॅरेथॉन बैठकांचा धडाका लावला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी पक्ष संघटन सुसंगत व सक्षम करण्याच्या उद्देशाने या बैठकांचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीदरम्यान विद्यमान संघटन रचना, स्थानिक आव्हाने आणि राज्य व जिल्हा नेतृत्वातील समन्वय या मुद्यांवर सविस्तर चर्चा झाली.पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या बैठकांमध्ये जिल्हा व तालुका समित्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत, पक्ष नेतृत्वाकडून सर्वतोपरी पाठिंबा देण्याची हमी दिली. “स्थानिक नेतृत्वाला सर्वेक्षण अहवाल, प्रचार पथके आणि आवश्यक संसाधनांच्या माध्यमातून पूर्ण सहकार्य दिले जाईल. आपले ध्येय आहे संघटन मजबूत करणे आणि स्थानिक निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभावी विजय सुनिश्चित करणे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
तटकरे यांनी पुढे सांगितले की या बैठका म्हणजे केवळ आढावा नव्हे, तर पक्षातील संवाद आणि समन्वय अधिक प्रभावी करण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. स्थानिक प्रश्नांना वेळीच दखल घेऊन त्यावर मार्ग शोधून जिल्हास्तरावर संघटनात्मक बळ वाढवणे हाच उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.
या बैठकींना राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते धनंजय मुंडे, नरहरी झिरवळ, रुपाली चाकणकर आणि संजय खोडके उपस्थित होते. समित्यांच्या कामाचा आढावा घेऊन संघटन अधिक सक्षम आणि परिणामकारक करण्याच्या दृष्टीने पुढील रणनीती ठरवण्यात आली.












































