अजितदादांचा इथेही घोर अवमान, भाजपा विरोधात राष्ट्रवादी नेत्यांकडून टीका

0
326

मुंबई, दि. १५ (पीसीबी) : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई-पुण्यातील दौऱ्यांमधील कार्यक्रमांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांसाठी राज शिष्टाचार पाळला न गेल्याचे दिसून आले. देहू येथील कार्यक्रमात पंतप्रधानांच्या समोर अजितदादांना भाषण न करु देण्याचा मुद्दा तापलेला असतानाच मोदींच्या तिसऱ्या कार्यक्रमात तर त्यांच्यासाठी खुर्चीही नसल्याचे दिसून आले. व्यासपीठासमोरील कॅबिनमध्ये दुसऱ्या रांगेत अजितदादांना स्थानापन्न व्हावे लागले.

देहूपाठोपाठ राजभवनानंतर ‘बीकेसी’त आलेल्या पवार यांना व्यासपीठापुढच्या एका पेंडॉलमध्ये गुजतराचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यामागील खुर्चीत बसावे लागले. बीकेसीमध्ये मुंबई समाचार वृत्तपत्राच्या द्विशताब्दी महोत्सवास नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे खासदार मनोज कोटक, समाचारचे संचालक होर्मसजी कामा यांच्यासाठी खुर्च्या मांडल्या होता.

राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांच्यासाठी व्यासपीठावर खुर्ची नसल्याने त्या शेजारील एका केबिनमध्ये बसणे पवार यांनी पसंत केले. तिथेही पहिल्या रांगेत जागा नसल्याने ते पटेल यांच्यामागील खुर्चीत बसले. तोपर्यंत पवार नेमके कुठे बसले, याकडे अनेकांचे लक्ष होते. शेवटी कार्यक्रम संपल्यानंतर मोदींना त्यांच्या गाडीपर्यंत पोचविण्यासाठी पवार सगळ्यात पुढे होते. यानिमित्ताने उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी आपले कर्तव्य पार पाडल्याचेही सांगण्यात येत आहे.

मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून या कार्यक्रमात पवार यांच्यासाठी व्यासपीठावर खर्ची का नव्हती, असा प्रश्न आता विचारला जात आहे. व्यासपीठावर नाही; तर किमान त्यापुढच्या मुख्य पेंडॉलमध्ये तरीही पवार यांना मान द्यायला हवा होता, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे. मोदी यांच्या उपस्थितीत देहुतील कार्यक्रमात फडणवीसांचे भाषण झाले. त्यानंतर लगेचच मोदींच्या नावाचा पुकारा झाला; पण तेव्हा मोदींना पवारांकडे हात करून ते बोलतील, असे सूचित केले. मात्र, मोदींच बोलायला उभे राहिले. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडून संताप व्यक्त होत आहे.

पंतप्रधान मोदींपासून साऱ्याच बड्या नेत्यांच्या व्यासपीठावरून सडेतोड बोलणाऱ्या अजित पवार यांना मोदींच्या दोन कार्यक्रमांत डावलल्याची चर्चा रंगली आहे. देहूनंतर ‘बीकेसी’ तही तसे घडल्याने हा योगायोग आहे की राजकारण आहे, यावरही उलटसुलट चर्चा सुरू आहे. आधी देहूत न बोलू देण्यावरुन चिडलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आता आखणी आक्रमक होण्याची शक्यता आहे. मोदींच्या कार्यक्रमांत पवारांना डावलून भाजप नेमका काय इशारा दिला, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.