अचानक गायब होण्याच्या वृत्ताने अजित पवार संतापले, अन्…

0
196

पुणे, दि. ८ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांचे पुण्यातील कालचे (शुक्रवारी) कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. अजित पवार हे अचानक कार्यक्रम सोडून गेल्याने ते कुठे गेले ? याबाबतच्या चर्चां रंगल्या होत्या. पण आज (शनिवारी) अजितदादा पुण्यातील एका कार्यक्रमास दिसले. सततच्या कार्यक्रमांमुळे पित्ताचा त्रास होत होता, असे त्यांनी स्पष्ट केले.

अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा यांच्या हस्ते आज सकाळी खराडी (पुणे) मधील रांका ज्वेलर्सच्या शोरूमचे उद्घाटन झाले.अजित पवार आणि पक्षातील ७ आमदार देखील नॉट रिचेबल असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या आहे. त्यानंतर ‘अजित पवार नॉट रिचेबल’ अशा प्रकारचे वृत्त काही माध्यमांनी दिले होते. या वृत्ताचा अजित पवारांनी समाचार घेतला. ते म्हणाले, “मी सतत दौरे करत असतो, त्यामुळे जागरण होत असते. माणूस आहे कधी आजारी पडू शकतो, काल मला पित्ताचा त्रास झाल्यामुळे बरं वाटत नव्हतं त्यामुळे मी औषध घेऊन विश्रांती घेतली परंतु माध्यमातून त्याचा विपर्यास करण्यात आला.”

गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची पोटनिवडणुक होणार आहे, याबाबत ते म्हणाले, “पुण्याची लोकसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्याच्या संदर्भात, कोणत्याही प्रकारची चर्चा महाविकास आघाडी झालेली नाही. याबाबतची चर्चा केवळ माध्यमांमध्ये आहे. मुळात ही पोट निवडणूक केव्हा होणार हे अजून स्पष्ट झालेले नाही, निवडणूक आयोगाने त्याबाबतचा निर्णय घेतल्यानंतर आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ,”

पुणे महापालिकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या नदी सुधार प्रकल्पाबाबत पवार म्हणाले, “या प्रकल्पामुळे नदीतील पाण्याच्या प्रवाहाला अडथळा येणार नाही याची काळजी जलसंपदा विभागाने घ्यावी, त्यासाठी तज्ज्ञांच्या मदतीने उपाययोजना कराव्यात आणि पुणेकरांचे नुकसान होणार नाही असा निर्णय घ्यावा. विकास करताना पर्यावरणाचे ही संतुलन राखणे गरजेचे आहे,”

अयोध्या दौऱ्यावरुन मुख्यमंत्र्यांना टोला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज सांयकाळी अयोध्येला रवाना होणार आहेत, याबाबत पत्रकारांनी त्यांना विचारले असता त्यांना मुख्यमंत्र्यांना टोला हाणला. “राजकीय क्षेत्रातच नव्हे तर सर्वांनाच आपापल्या श्रद्धा जपण्याचा अधिकार आहे. सर्वजण कोठे ना कुठेतरी दर्शनासाठी जात असतात, मात्र ते जाताना प्रसिद्धी करणे योग्य आहे का,” असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला.