अखेर हिजाब प्रकऱण सर्वोच्च न्यायालयाच्या बेंचकडे

0
243

नवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी) – कर्नाटक हिजाब वादावर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची वेगवेगळी मते आली आहेत. न्यायमूर्ती गुप्ता यांनी ही बाब अगदी सुरुवातीलाच स्पष्ट केली होती. ते म्हणाले की, आमचे विचार वेगळे आहेत. हायकोर्टाच्या निर्णयावर दुसरे न्यायाधीश सुधांशू धुलिया म्हणाले- मला वाटतं हायकोर्टाने याप्रकरणी चुकीचा मार्ग निवडला. बेंचने म्हटले की, हे प्रकरण योग्य निकालासाठी सरन्यायाधीशांकडे पाठवण्यात यावे.

अशा परिस्थितीत हे प्रकरण घटनापीठाकडे पाठवले जाऊ शकते असे दिसते. याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद असा होता की, या मुली विद्यार्थिनी असण्यासोबतच भारताच्या नागरिकही आहेत. अशा परिस्थितीत ड्रेस कोडचा नियम लागू करणे हे त्यांच्या घटनात्मक अधिकाराचे उल्लंघन ठरेल.

दरम्यान, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या कोर्टाने 10 दिवसांच्या युक्तिवादानंतर 22 सप्टेंबर रोजी निकाल राखून ठेवला होता. कर्नाटक सरकार आणि मुस्लिम पक्षाची बाजू ऐकल्यानंतर कोर्टाने म्हटले की, आम्ही तुमचे सर्व ऐकले आहे. आता आमचा गृहपाठ सुरू होतो. हिजाब वादावर कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात 23 याचिका दाखल आहेत. त्या मार्चमध्ये दाखल करण्यात आल्या होत्या. ज्येष्ठ वकील राजीव धवन, दुष्यंत दवे, संजय हेगडे आणि कपिल सिब्बल हे याचिकाकर्त्यांतर्फे बाजू मांडत आहेत.

कर्नाटक उच्च न्यायालयाचा निकाल- हिजाब बंधनकारक नाही –
15 मार्च रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाने सरकारी प्री-युनिव्हर्सिटी गर्ल्स कॉलेज, उडुपीच्या काही मुस्लिम विद्यार्थिनींनी वर्गात हिजाब घालण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली. आपल्या आधीच्या आदेशाला कायम ठेवत न्यायालयाने म्हटले की, हिजाब घालणे हा इस्लामच्या अनिवार्य प्रथेचा भाग नाही. घटनेच्या कलम 25 नुसार त्याला संरक्षण देण्याची गरज नाही. न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देत काही मुलींनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, त्यावर सुनावणी सुरू आहे.

उडुपीतून सुरू झाला होता वाद –
कर्नाटकातील हिजाबचा वाद जानेवारीच्या सुरुवातीला उडुपी येथील एका सरकारी महाविद्यालयात सुरू झाला, जिथे मुस्लिम मुलींना हिजाब घालण्यास मनाई करण्यात आली होती. शाळा व्यवस्थापनाने हे ड्रेस कोडच्या विरोधात म्हटले होते. यानंतर हा वाद इतर शहरांतही पसरला.
मुस्लीम मुली याला विरोध करत आहेत, त्याविरोधात हिंदू संघटनांशी संबंधित मुलांनीही भगवी शाल परिधान करून विरोध सुरू केला. महाविद्यालयात आंदोलनाचे हिंसक चकमकीत रूपांतर झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा मारा करावा लागला.