`शिवरायांच्या पुण्यात गद्दारांना गाडा`

0
410

मुंबई,दि. ३० (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. पिंपरी चिंचवड मधील अजित पवारांचे निकटवर्तीय माजी महापौर संजोग वाघेरे पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे. यावेळी बोलताना शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांनी, `शिवरायांच्या पुण्यात गद्दारांना गाडा` असे
आवाहन केले. मातोश्री येथे वाघेरेंचा पक्षप्रवेश पार पडला आहे. यावेळी शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत, संपर्कनेते सचिन आहेर, संघटक एकनाथ पवार, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, पिंपरी चिंचवड शहरप्रमुख सचिन भोसले आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. पिंपरी चिंचवड शहरातून दोनशेवर वाहनांनी शिवसैनिक या कार्यक्रमासाठी आले होते.

यावेळी उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले की, “मला भेटल्यावर तुम्ही भावूक झालात, मला भावूक आणि घाऊक याचा फरक कळायला लागला आहे. काहीजण भावूक आहे, जे भावनेला महत्त्व देतात, ज्यांच्यात संवेदना आहेत, ते निष्ठेनं भगव्यासोबत आहेत. काहीजण घाऊक आहेत, त्यांना आता खोक्यामध्ये बंद करयच आहे. तसं पाहिलं तर मावळ मतदारसंघ जेव्हापासून निर्माण झाला, तेव्हापासूनच शिवसेना जिंकत आली आहे. आधी बाबर होते. त्यानंतर मी शब्द दिला होता, म्हणून जे आता गद्दार झालेत, त्यांना उमेदवारी दिली. म्हणजे, असं काही नव्हतं की, शिवसेनेकडे उमेदवार नव्हता. आता त्यांनी गद्दारी केली, गद्दार आणि स्वाभिमानी हा संजोग वाघेरे आणि त्या गद्दारांमध्ये फरक आहे. आज तुम्ही सगळे शिवसेनेत आलात, काय असं शिवसेनेमध्ये आहे आता की तुम्ही येताय? सत्ता जी होती, ती पुन्हा येणारच आहे, त्याबाबत दुमत नाही. पण सत्ता त्यांनी हिसकावून घेतली, गद्दारी केली.”

“आज तुम्ही सर्वांनी पक्षप्रवेश केला. इथे सत्ता नसताना सत्ता आणण्याच्या जिद्दीनं तुम्ही इथे आलात. काही आपली खुर्ची टिकवण्याच्या लाचारीनं गेलेले आहेत, हाच स्वाभिमान आणि लाचारीतला फरक आहे. जिथे सत्ता असते तिथे, गर्दीचा ओघ असतो. पण इथे वेगळं आहे. मला तुमचा उत्साह सांगतोय की, तिथे प्रचाराला येण्याची गरज नाही, आजच तिथे मावळमध्ये भगवा फडकला आहे. हा मावळ मतदारसंघ वेगळा आहे. तरी मी प्रचाराला तर येईलच.”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“सातत्यानं विचारलं जातं की, इंडिया पंतप्रधान पदासाठी पर्याय कोण? पण आमच्याकडे पंतप्रधान पदांसाठी खूप पर्याय आहेत, पण भाजपकडे कोण आहेत? आणि जे आहेत, त्यांचं कतृत्त्व आपण गेली दहा वर्ष पाहिलंच आहे.”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.