अखेर शिवसेनेचा ढाण्यावाघ गुलाब पाटील सुध्दा गळाला

0
411

मुंबई, दि. २२ (पीसीबी) एकनाथ शिंदे यांच्या बंडाला वाढता पाठिंबा मिळत असून शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणून ओळखले जाणारे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी गुवाहटीकडे आपला मोर्चा वळवला. याशिवाय संजय राठोड, योगेश कदम आणि चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर)हे तीन आमदारही शिंदे यांच्या बंडात सहभागी झाले. गुलाबराव पाटील हे कालपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्याची भाषा करत होते. पण त्यांनीही आपला पवित्रा बदलला. मंत्रीमंडळाच्या बैठकीला ते उपस्थित राहिले नाहीत. सकाळपासूनच ते नाॅट रिचेबल होते. त्यांच्या फुटिरतेबद्दल चर्चा सुरूच होती. दुपारी दीडनंतर ते गुवाहटीच्या वाटेवर असल्याचे विश्वासार्ह वृत्त प्राप्त झाले. पाटील यांच्यासह संदिपान भुमरे हे दोन कॅबिनेट मंत्री शिंदे यांच्यासोबत आहेत. याशिवाय बच्चू कडू, शंभूराज देसाई असे दोन राज्यमंत्रीही तेथे आहेत. त्यामुळे एकूण चार मंत्र्यांनी बंडात सक्रिय सहभाग नोंदविल्याचे स्पष्ट झाले आहे.

बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची भूमिका घेऊन आम्ही पुढे जात आहोत. सत्तेसाठी हिंदुत्वाशी प्रतारणा करणार नाही. गटनेता निवडताना मेजॉरिटी लागते. आमच्याकडे ४२ आमदार आहेत. मी शिवसेनेतच आहे, असा दावा एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.