अखेर लाडोबाची आई शिवानी अगरवाल पोलिसांच्या ताब्यात

0
191

आजोबा, वडिल आणि आई अशा संपूर्ण कुटुंबालाच त्यांचा लाडोबा असलेल्या वेदांत अगरवालने जेलची हवा खायला पाठवले. देशभर गाजणाऱ्या पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. भरधाव कारच्या धडकेत दोघांचे बळी घेणाऱ्या अल्पवयीन आरोपीच्या आईलाही आता पुणे क्राईम ब्रांचकडून ताब्यात घेण्यात आले आहे. रक्ताच्या नमुन्यात फेरफार आणि डॉक्टरांना पैसे देण्याच्या प्रकरणात सहभाग असल्याच्या आरोपाखाली शिवानी अगरवाल यांना पुणे गुन्हे शाखेने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या प्रकऱणात ससून हॉस्पटलचे निलंबित डॉ.तावरे यांनी सर्वांची नावे सांगण्याचा इशारा दिल्याने खळबळ आहे.

कल्याणीनगर येथे झालेल्या अपघातातील अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याच्या प्रकरणात वडिलांना मदत केल्याच्या आरोपाखाली, तसेच डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांना पैसे दिल्याच्या प्रकरणात आरोपी मुलाची आई शिवानी अगरवालचाही सहभाग असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. शिवानी अगरवाल गेल्या काही दिवसांपासून आपल्या पुण्यातील घरी नव्हत्या, त्या कुठे गायब झाल्या आहेत, याचा थांगपत्ता लागत नव्हता. मात्र पुणे क्राईम ब्रांचने त्यांना शोधून काढत ताब्यात घेतलं. त्यांना आज कोर्टासमोर हजर करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

भरधाव कारच्या धडकेत दोघांचे बळी घेणाऱ्या अल्पवयीन आरोपीला बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. मात्र आपल्या पोराचा गुन्हा लपवण्याच्या नादात अख्खं कुटुंबच गजाआड झालं आहे. आधी निष्काळजी बाळगणाऱ्या बिल्डर बाप विशाल अगरवाल याला बेड्या ठोकण्यात आल्या. त्यानंतर चालकाचं अपहरण आणि धमकवल्या प्रकरणी आजोबा सुरेंद्रकुमार अगरवाल गजाआड झाले. तर आता पतीला मदत करणारी शिवानी अगरवालही ताब्यात आहे.