जालना,दि.०९(पीसीबी) – राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून सोमवारी जालना शहर महापालिकेची घोषणा केली आहे. प्रशासकीय प्रमुखपदाची जबाबदारी मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांच्याकडे कायम ठेवण्यात आली आहे. जालना महापालिकेसाठी शहरात राजकीय नेत्यांचे एकमत नव्हते. मात्र, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी महापालिकेसाठी आग्रही भूमिका घेतली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तत्कालीन ठाकरे सरकारमध्ये नगरविकास मंत्री असताना श्री. खोतकर यांनी जालना महापालिकेची मागणी रेटून धरली होती. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर ता.नऊ मे २०२३ रोजी जालना शहर महापालिकेची उद्घोषणा राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून करण्यात आली. शहर महापालिकेसाठी काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी विरोध केला होता. मात्र, महापालिकेसाठी केवळ नऊ हरकती आल्या. या हरकती राज्य शासनाकडे दाखल झाल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री श्री. शिंदे व उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची भेट ही घेतली होती.
त्यामुळे जालना शहर महापालिकेची घोषणा कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष होते. अशात सोमवारी नगरविकास विभागाकडून जालना शहर महापालिकेची घोषणा करण्यात आली आहे. नगरविकास विभागाकडून जालना शहर महापालिकेची घोषणा केली आहे. त्यामुळे नगरपालिका हद्दीतील क्षेत्र यापुढे महापालिका हद्दीत असणार आहे. शासनाकडून महापालिका हद्दवाढीसंदर्भात अद्यापि कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत.