दि . १ ( पीसीबी ) – वादग्रस्त विधानं करणाऱ्या माणिकराव कोकाटेंकडून अखेर कृषि खात काढून घेण्यात आले आहे. दत्तात्रय भरणेंना राज्याचे नवे कृषिमंत्री म्हणून पदभार देण्यात आला आहे. तर, राजीनामा न घेता कोकाटेंना क्रीडा व युवक कल्याण विभागाचा पदभार देण्यात आला आहे. संध्याकाळाच्या सुमारास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. या बैठकीत कोकाटेंकडील कृषिखातं काढून घेण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर रात्री उशिरा कोकाटेंचा राजीनामा न घेता त्यांच्याकडील कृषिखात काढून घेत त्यांना दत्ता भरणेंकडील खात्याचे मंत्री बनवण्यात आले आहे. याबाबतची शासन अधिसूचनादेखील जारी करण्यात आली आहे.
दत्तात्रय भरणेंनी केलं होत सूचक विधान?
कोकाटे यांच्याकडील खात काढून घेण्यापूर्वी दत्तात्रय भरणे यांनी सूचक विधान करत कृषि खातं त्यांच्याकडे येणार असल्याचे संकेत दिले होते. कृषी खात्याच्या संदर्भात मला अजून तरी काहीही माहिती नाही. मात्र, बारामतीकर न मागता सगळं देतात. मला कारखान्यात, जिल्हा परिषद, आमदारकी आणि मंत्रिमंडळात न मागता संधी दिली. त्यामुळे कोण काय करतं हे वरिष्ठांना सगळं माहिती असतं असे भरणे म्हणाले होते.
दोन दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना धारेवर धरत त्यांचे कान टोचले होते. यात फडणवीसांनी मंत्र्यांना वादग्रस्त विधानं, कृती अजिबात खपून घेतली जाणार नाही, असे प्रकार होत राहिले तर, सरकारी प्रचंड बदनामी होते. त्यामुळे ही अखेरची संधी, काय कारवाई ती करूचं असेही फडणवीसांनी सांगितले. तसेच यापुढे एकही प्रकार खपवून घेणार नसल्याची तंबीही फडणवीसांनी सर्व मंत्र्यांना दिली होती. त्यानंतर अखेर फडणवीसांनी विधानसभेत रमीचा डाव मांडणाऱ्या कोकाटेंचा डाव उधळून लावत त्यांचे डिमोशन करत त्यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण खात्याचा पदभार देण्यात आला आहे.