अखेर ठरलं! ‘या’ मतदारसंघातून अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात?

0
71

मुंबई, दि. 18 (पीसीबी) : केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी पत्रकार परिषद घेत राज्यातील निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार येत्या २० नोव्हेंबर २०२४ ला महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. तर तीन दिवसांनी २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच राज्यातील सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विविध मतदारसंघांची चाचपणी केली जात आहे. अशातच आता आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे नेते अमित ठाकरे हे रिंगणात उतरणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमित ठाकरे हे माहिम मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात, असे म्हटले जात आहे.

अमित ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वी या निवडणुका लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. अमित ठाकरे यांनी पक्षाच्या बैठकीत ही इच्छा मांडली होती. यानंतर विविध मतदारसंघांची चाचपणी करण्यात आली. त्यातच आता खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित ठाकरे हे माहिम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे स्वत: चाचपणी करत आहेत. अमित ठाकरे यांनी कोणत्या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी किंवा लढवू नये, याचा आढावा सध्या राज ठाकरेंकडून घेतला जात आहे. मात्र कार्यकर्त्यांकडून सातत्याने अमित ठाकरेंच्या निवडणुका लढवण्याबद्दलची मागणी केली जात आहे. यापूर्वी अमित ठाकरे यांच्यासाठी भांडुप, मागठाणे आणि माहिम या तीन मतदारसंघांची निवड करण्यात आली होती. राज ठाकरे यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे.

त्यातच आता विविध मतदारसंघांची चाचपणी झाल्यानंतर अमित ठाकरेंसाठी माहिम विधानसभा मतदारसंघ हा सर्वाधिक सुरक्षित असल्याचे मानलं जात आहे. त्यातच शर्मिला ठाकरे यांनीही अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. तसेच कार्यकर्त्यांनीही याची मागणी केली होती. पण याबद्दलचा अंतिम निर्णय हा पक्षप्रमुख राज ठाकरे घेणार आहेत. त्यामुळे अमित ठाकरे हे निवडणूक लढणार की नाही, हे राज ठाकरेंच्या निर्णयानंतरच स्पष्ट होणार आहे