मुंबई, दि. १ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीची कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकते. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर आता राष्ट्रवादी पक्षात उघड दोन गट पडलेले आहेत. या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघाची चांगलीच चर्चा होत आहे. या जागेवर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि खासदार सुप्रिय सुळे यांच्यात लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावरच आता अजित पवार गटातील नेते सुनिल तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवर थेट भाष्य केलंय. सुनेत्रा पवार याच बारामती मतदारसंघाच्या उमेदवार असतील, असं तटकरे म्हणालेत. ते ‘टीव्ही ९ मराठी’ या मराठी वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या मुलाखतीच्या कार्यक्रमात बोलत होते.
संसदेत मी जाणार आहे की माझा नवरा जाणार आहे. त्यामुळे माझ्या नवऱ्याने भाषण केल्यावर कसे चालेल. मी सदानंद सुळे यांना भाषण करायला पाठवते. तुम्ही मला मतं द्याल का? असे विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी एका भाषणात केले. त्यांच्या या विधानावर सुनिल तटकरे यांनी नाराजी व्यक्त केली. “आम्ही सुसंस्कृत महाराष्ट्रात राहतो. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे आम्ही वारसदार आहोत. आम्ही वैचारिक लढा उभा करत आहोत. एका महिलेने दुसऱ्या महिलेबाबत असे वक्तव्य करावं हे दुर्दैवी आहे. कुठल्याही महिला खासदाराचा पती भोजनालयात बायकोची पर्स घेऊन बसलेला मी पाच वर्षांत पाहिलेला नाही. पण सुप्रिया सुळे यांनी केलेलं विधान हे थेट सुनेत्रा पवार यांच्यासाठी होतं, असं मी मानतो. मला नम्रपणे सांगायचं आहे की अजित पवार गेली ३५ वर्षांपासून भाषण करत आहेत. सुप्रिया सुळे यांना निवडून आणण्यासाठीदेखील तीन वेळा अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघ पिंजून काढलेला आहे. मग हे सारं का विसरावं? नैराश्य येऊ शकतं. पण हे नैराश्य एवढ्या पराकोटीच्या वक्तव्यापर्यंत पोहोचेल असं मला वाटलं नव्हतं,” असं सुनिल तटकरे म्हणाले.
“सुनेत्रा पवार यांनी बारामतीत खूप मोठं सामाजिक काम केलेलं आहे. बारामती टेक्स्टाईल, बारामती क्लब, अनेक शैक्षणिक संस्था, विद्या प्रतिष्ठान असेल या साऱ्यांत सुनेत्रा पवार यांनी काम केलेलं आहे. सुनेत्रा पवार यादेखील भाषण करतात. त्या कधीही पर्स घेऊन कुठल्या कार्यक्रमाला गेल्याचं मी पाहिलेलं नाही. ज्या दिवशी सुनेत्रा पवार संसदेत जातील तेव्हा त्या उत्तम पद्धतीने बोलतील याची मला खात्री आहे. पण माणूस जेव्हा पहिल्यांदा निवडणूक लढवतो तेव्हा तो नवीनच असतो. मी १९९५ साली पहिल्यांदा आमदार झालो. कोणाच्या तरी आयुष्यात पहिली वेळ आहेच. दुसऱ्यांना कमी लेखणं योग्य नाही,” अशा भावना तटकरेंनी व्यक्त केल्या.
“बारामतीची जागा आम्ही महायुती म्हणून लढवणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना (एकनाथ शिंदे गट), भाजपा आम्ही एकत्रित बसू आणि जागावाटपावर चर्चा करू. बारामतीची जागा आम्हाला मिळावी यासाठी आमचा प्रयत्न असेल. त्यावर चर्चा होईल. राष्ट्रवादीने ही जागा लढवायची ठरवली तर मी अधिकृतपणे सांगतो की सुनेत्रा पवार या बारामतीच्या उमेदवार असतील,” असे स्पष्टपणे सुनिल तटकरे म्हणाले. तसेच महायुतीत बारामतीची जागा आमच्याकडे आली तरच सुनेत्रा पवार या बारामतीच्या उमेदवार असतील. मात्र जागावाटपावर अद्याप चर्चा नाही, असेही तटकरे यांनी पुढे स्पष्ट केले.