अखेर ठरलं! नवाब मलिक यांना एबी फॉर्म, ‘घड्याळा’वरच विधानसभा लढणार

0
69

मुंबई, दि. 29 (पीसीबी) : माजी मंत्री नवाब मलिक अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादीकडून नवाब मलिक यांना एबी फॉर्म मिळाला आहे. मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून आज दुपारी ३ वाजता ते अर्ज भरणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी, शेवटच्या क्षणी मलिक यांना तिकीट मिळालं आहे. त्यामुळे भाजपचा विरोध झुगारुन अजित दादांनी मलिक यांना उमेदवारी दिली, की विरोध दूर करण्यात दादांना यश आलं, हे समजलेलं नाही. विशेष म्हणजे मलिक यांच्या पारंपरिक अणूशक्तीनगर मतदारसंघातून त्यांची लेक सना मलिक विधानसभा लढवणार आहे. त्यामुळे मुंबईतून एकाच निवडणुकीत बाप-लेक वेगवेगळ्या मतदारसंघातून विधानसभेला सामोरे जाताना दिसणार आहेत.

मुंबईतील मानखुर्द शिवाजीनगर या मतदारसंघात महाविकास आघाडीचा मित्रपक्ष समाजवादी पक्षातर्फे विद्यमान आमदार अबू आझमी यांनी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादीचे नवाब मलिक हेही या मतदारसंघातून इच्छुक असताना त्यांनी पक्षाच्या चिन्हावर लढू नये यासाठी राष्ट्रवादीचे नेतृत्व त्यांची मनधरणी करत होते. परंतु, मलिक हे निवडणूक लढवण्यावर ठाम राहिले. नवाब मलिक यांनी आज सकाळी भव्य शक्तिप्रदर्शन करत रॅली काढली. यावेळी ते अपक्ष लढणार की राष्ट्रवादीकडून ते स्पष्ट होत नव्हते. माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केल्यावरही त्यांनी हसून हात जोडले आणि ‘मौनं सर्वार्थ साधते’ अशी भूमिका घेतली. या जागेवर महायुतीने उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे मलिक महायुतीतून लढणार, की पक्षचिन्हाविना लढवून मलिकांना महायुती ‘अदृश्य’ पाठिंबा देणार, असा संभ्रम होता.

नवाब मलिक हे मुंबईतील अणूशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर आमदारपदी निवडून आले आहेत. मलिक हे पाच वेळा आमदार झाले आहेत. १९९६, १९९९ आणि २००४ अशा तीन वेळा ते नेहरुनगर मतदारसंघातून निवडून आले आहेत. तर २००९ मध्ये ते अणूशक्तीनगरचे आमदार झाले. २०१९ मध्ये पुन्हा त्यांनी याच मतदारसंघातून आमदारकी मिळवली. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे. नवाब मलिक यांना २३ फेब्रुवारी २०२२ रोजी ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचाही त्यांच्यावर आरोप होता. मलिक यांनी दाऊद इब्राहिमच्या साथीदाराकडून प्रचलित बाजारभावापेक्षा कमी किमतीत मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर केलेला होता.