लखनऊ, दि. २८ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकिसाठी उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस बरोबर आघाडी करणाऱ्या समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांना घेरण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. देशातील सर्वात मोठ्या राज्यात लोकसभेच्या ८० जागा असून तिथे किमान ७० जागांवर यश मिळण्याची भाजपला अपेक्षा होती. प्रत्यक्षात समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांची आघाडी झाल्याने मतविभागणी टळणार असून किमान ३० जागावर परिणाम संभवतो. भाजपच्या ते लक्षात आल्याने आता अखिलेश यांच्याभोवती फास आवळण्याचे काम सुरू आहे.
समाजवादी पक्षाचे (एसपी) प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) चौकशीसाठी समन्स बजावले आहे. यादव हे आरोपी नसून केवळ साक्षीदार म्हणून त्यांना बोलवले आहे.
रिपोर्ट्सनुसार, हे प्रकरण बेकायदेशीर खाणकामाशी संबंधित आहे, ज्यामध्ये अखिलेश यांना उद्या म्हणजेच २९ फेब्रुवारीला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. या प्रकरणात अखिलेश आरोपी नसून साक्षीदार म्हणून त्यांची चौकशी केली जाईल.
२१ फेब्रुवारी रोजी हे समन्स जारी करण्यात आले होते, त्याचा तपशील आता समोर आला आहे. प्रकरणे नेमके काय आहे ते जाणून घेऊ या.
ही बाब २०१२-१३ ची आहे. त्यावेळी अखिलेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते आणि खाण खातेही त्यांच्याकडे होते. हमीरपूरमध्ये कर्मचाऱ्यांच्या संगनमताने खनिजाचे अवैध उत्खनन झाल्याचा आरोप आहे. २०१६ मध्ये हायकोर्टाच्या आदेशानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली होती, ज्यामध्ये माजी मंत्री गायत्री प्रजापती यांचे नाव समोर आले होते. अखिलेश सरकारमध्ये अनेक जिल्ह्यांच्या कलेक्टर राहिलेल्या बी चंद्रकला यांनाही आरोपी करण्यात आले होते.