अंध मतदारांनी सर्व मतदारांना केले मतदान करण्याचे आवाहन…

0
50

पिंपरी, दि. २४ – आम्ही अंध असलो तरी, मतदान करण्याच्या बाबतीत आम्ही डोळस आहोत. आम्ही प्रत्येक निवडणूकीत सहभागी होत असून मतदानाच्या दिवशी सुरवातीलाच सहभागी होत असून मतदानाच्या दिवशी सुरवातीलाच मतदान करण्याचा आमचा मानस असतो. मतदानाच्या दिवशी आम्ही सर्वजण आपापल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करीत असतो. निवडणूक विभागाकडून आम्हाला चांगले सहकार्य मिळत असते. व्हीलचेअर, मदतनीस यामुळे मतदान करणे आम्हाला सोपे जाते. या वेळीदेखील आम्ही विधानसभा निवडणूकीत १०० टक्के मतदान करणार आहोत. सर्व शहरवासियांनीदेखील मतदान करावे असे मत अंध मतदारांनी व्यक्त केले.
जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांचे निर्देशानुसार २०६, पिंपरी विधानसभा मतदार संघाच्या वतीने स्वीप उपक्रमांतर्गत कार्यक्षेत्रात व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. अजंठानगर येथील “होम फॉर द ब्लाईंड” या अपंग रोजगार उद्योग व तांत्रिक प्रशिक्षण केंद्र येथे मतदार जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आलेला होता. या कार्यक्रमात अंध मतदारांनी “आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करु आणि मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच आम्ही धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू.” अशा आशयाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी आपली मते व्यक्त केली.
मतदान जनजागृतीच्या या कार्यक्रमास माध्यम समन्वयक विजय भोजने, स्वीप नोडल अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, दिव्यांग कक्षाचे नोडल अधिकारी शरद पाटील, सहाय्यक नोडल अधिकारी बालाजी गिते, नायब तहसीलदार अभिजीत केंद्रेकर तसेच हॅण्डीकॅप सेंटरचे व्यवस्थापक सुनिल चोरडीया उपस्थित होते.
यावेळी बालाजी गिते यांनी अंध मतदारांसाठी मतदान केंद्रावर उपलब्ध असणा-या रॅम्प, व्हीलचेअर, मदतनीस, मॅग्नीफाईंग ग्लास, ब्रेल मतपत्रिका याशिवाय सक्षम ऍ़पद्वारे पीक अप ऍ़ण्ड ड्रॉपची सोय इत्यादी सुविधांविषयी माहिती दिली.
हॅण्डीकॅप सेंटरचे व्यवस्थापक सुनिल चोरडीया यांनी स्वत: अंध असून अनेक दशकांपासून मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर लवकर जाऊन मतदानाचा हक्क बजावत असल्याचे सांगितले. तसेच उपस्थित अंध मतदारांना देखील लवकरात लवकर मतदान करुन मतदानाचा महत्त्वपूर्ण हक्क बजावण्याचे आवाहन केले.