अंधेरी पूर्व पोटनिवडणुकिमुळे उध्दव ठाकरे जोमात

0
238

– दै. सामना तून भाजपचा अत्यंत खरपूस शब्दांत समाचार
मुंबई, दि. १८ (पीसीबी) : अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत भाजपने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत पक्षाचे उमेदवार मुरजी पटेल यांचा अर्ज मागे घेतला. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी घडलेल्या या घडामोडीमुळे या पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. दिवंगत आमदाराची पत्नी या निवडणुकीला उभी असल्याने आम्ही महाराष्ट्राची संस्कृती जपत उमेदवारी अर्ज मागे घेत आहोत, असा दावा भाजपकडून करण्यात आला. मात्र भाजपच्या या दाव्याचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’तून जोरदार समाचार घेण्यात आला आहे. तसंच शिवसेनेतील फुटीनंतर होत असलेल्या या पहिल्याच निवडणुकीत भाजपने माघार घेतल्याने उद्धव यांच्या आत्मविश्वासातही कमालीची वाढ झाल्याचं आजच्या सामना अग्रलेखातून दिसत आहे.

‘अंधेरीच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या मशालीचा पहिला चटका महाराष्ट्राच्या दुष्मनांना बसला आहे. पुढे पुढे पाहा. आणखी बरेच पोळायचे आणि भाजायचे बाकी आहे,’ असा इशारा सामनातून राजकीय विरोधकांना देण्यात आला आहे. तसंच ‘शिवसेनेचे लाखो अग्निवीर पेटलेल्या मशालीची पहिली विजयपताका घेऊन आता आणखी त्वेषाने बाहेर पडतील. याच धगधगत्या मशालीने स्वाभिमानाचे, अस्मितेचे, अन्यायाविरुद्धचे यज्ञकुंड पेटवून त्यात महाराष्ट्र-दुष्मनांच्या, लाचार मिंध्यांच्या समिधा अर्पण करतील. पेटलेली ही मशाल आता महाराष्ट्र आणि देश उजळवून टाकेल,’ अशी भविष्यवाणीही ‘सामना’तून करण्यात आली आहे.

‘भाजपचे माघारी नाट्य हे दिसते तसे सरळ नाही…’ –
संवेदनशीलता दाखवत आम्ही पोटनिवडणुकीतून माघार घेतली असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला असला तरी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मात्र भाजपच्या या निर्णयावर वेगळाच संशय आहे. ‘आधी एक ना अनेक कारस्थाने व नंतर बराच ऊहापोह केल्यावर भाजप उमेदवार मुरजी पटेल यांनी आता अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठीशरद पवारांपासून राज ठाकरे यांनी फडणवीसांना विनम्र आवाहन केले व शेवटी भाजप नेत्यांनी म्हणे दिल्लीशी चर्चा करून अंधेरीतील उमेदवार मागे घेतला. अर्थात भाजपचे माघारी नाट्य हे दिसते तसे सरळ नाही. पराभव झाला तर सरकारला मोठी किंमत चुकवावी लागेल हे त्यांच्या लक्षात आले असावे आणि शिवसेनेची मशाल जिंकणारच आहे याची खात्री भाजपला पटली असावी. शिवसेनेची ही भडकलेली मशाल बेइमानीचे इमले जाळून टाकेल. त्यापेक्षा आता माघार घ्यावी हेच बरे, हा सुज्ञ विचार भाजप व मिंधे सरकारने केलेला दिसतो. दुसरे म्हणजे भाजप उमेदवाराच्या उमेदवारी अर्जात अनेक गफलती समोर आल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज बाद होण्याचा धोका होता. या धोकादायक वळणावर भाजप आणि मिंधे गटाच्या गाडीस अपघात होणारच होता. त्या धोक्यातून सुटका करून घ्यायची म्हणून अचानक गाडीस ब्रेक मारून भाजपने यू टर्न घेतला,’ असा हल्लाबोल ‘सामना’तून करण्यात आला आहे.

एकनाथ शिंदेंवरही टीकेचे बाण –
अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत भाजपने उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाने भाजपला पाठिंबा दिला होता. भाजपने आता माघार घेतल्यानंतर सामनातून शिंदे यांनाही लक्ष्य करण्यात आलं आहे. ‘मशालीची सुरुवात चांगलीच झाली. अंधेरीतील याच मशालीचा प्रकाश आता संपूर्ण राज्याला उजळून टाकेल. शिवसेना हा अस्सल मराठीं बाण्याचा प्रखर हिंदुत्ववादी पक्ष आहे आणि हिंदुत्वात पवित्र अग्निदेवतेचे विशेष स्थान आहे. यज्ञ, होमकुंडातील धगधगत्या अग्नीत समिधांची आहुती देऊन धर्मावरील, समाजावरील संकट दूर केले जाते. अंधेरीत तेच घडले. शिवसेनेच्या विजयी मशालीने या पोटनिवडणुकीतील संकटे व अमंगलाचा नाश केला. भाजप… कारस्थानी आनंदीबाई… माफ करा, कमळाबाईंनी बेइमान ‘मिंधे’ गटास हाताशी पकडून जो घाव शिवसेनेवर, पर्यायाने महाराष्ट्रावर घातला, त्यास चोख प्रत्युत्तर देण्यासाठी नियतीनेच जणू अंधेरी पोटनिवडणुकीचे प्रयोजन केले होते,’ असं सामना अग्रलेखात म्हटलं आहे.