अंदरमावळमध्ये आरोग्य उपकेंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना, तलाठी कार्यालय उभारण्याचा मार्ग मोकळा

0
3


टाटा पॉवर कंपनीकडून २० गुंठे जागा मोफत; खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नांना यश

मावळ दि . १२ ( पीसीबी ) 
– मावळ लोकसभेतील वडेश्वर आणि माऊ ग्रामपंचायत हद्दीतील अंदर मावळ भागातील नागरिकांसाठी जिल्हा परिषद पुणे आणि मावळ पंचायत समिती मार्फत आरोग्य उपकेंद्र, उपरुग्णालय, पशुवैद्यकीय दवाखाना आणि तलाठी कार्यालय उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नांतून टाटा पॉवर कंपनीने २० गुंठे जागा मोफत दिली आहे. त्यामुळे सुसज्ज पशुवैद्यकीय दवाखान्यासह विविध सुविधा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या कागदपत्रांच्या हस्तांतरणाचा कार्यक्रम लोणावळा टाटा पॉवर कार्यालयात खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी टाटा पॉवर कंपनीचे अधिकारी मनोहर म्हात्रे आणि राजेंद्र गावडे, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश खांडभोर
मावळ गट विकास अधिकारी कुलदीप प्रधान, सरपंच छायाताई हेमाडे, ग्रामसेवक सचिन कासार, उपसरपंच वासुदेव लष्करी,
ग्रामपंचायत सदस्या मनीषाताई दरेकर, वासुदेव तनपुरे उपस्थित होते. शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश खांडभोर आणि मावळ गट विकास अधिकारी कुलदीप प्रधान यांच्या पाठपुराव्यातून जागा वडेश्वर ग्रामपंचायतीस हस्तांतरित करण्यात आली.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, मावळ विधानसभा मतदारसंघ वाड्या, वस्त्यांमध्ये विस्तारला आहे. अंदर मावळ सारख्या ग्रामीण भागातील नागरिक अनेक वर्षापासून पशुवैद्यकीय दवाखाना,उपआरोग्यकेंद्र,तलाठी कार्यालयाची मागणी करत होते. परंतु, जागेची मोठी अडचण होती. त्यामुळे या कार्यालयासाठी टाटा पॅावरकडून जागा मिळवण्यासाठी पाठपुरावा केला. शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश खांडभोर यांनी लक्ष घातले. टाटा पॅावर कंपनीने सकारात्मक प्रतिसाद दिला. २० गुंठे जागा मोफत दिली. आता या जागेत पशुवैद्यकीय दवाखाना,उपआरोग्यकेंद्र, तलाठी कार्यालय या सुविधा उपलब्ध करण्यात येतील. वडेश्वर ग्रामपंचायतीची इमारत बांधता येईल.
हा केवळ जमिनीचा तुकडा नाही, तर आरोग्य, प्रशासन आणि प्राणिप्रेमाशी निगडित नागरिकांच्या सुविधा अधिक जवळ आणणारे मोठा पाऊल आहे.