अंतर्मनाचा ठाव घेत काळजातून आलेली कविता देते जगण्याची प्रेरणा

0
149
  • भारत सासणे यांचे प्रतिपादन; डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे व न्यू ईरा पब्लिशिंग हाऊसतर्फे ‘त्रिकाल’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

“मानवाच्या अंतरमनात डोकावण्याची ताकत कवीच्या लेखनात असते. अंतर्मनाचा ठाव घेत काळजातून आलेली कविता आपल्याला जगण्याची प्रेरणा देते. फ. मु. शिंदे यांच्या कवितांमध्ये विश्व कारुण्य दिसते. वाट पाहण्याची, सहनशीलतेची क्षमता असणाऱ्या फ. मु. यांच्या ‘त्रिकाल’ काव्यसंग्रहात माणसाच्या जीवनाचे अप्रतिम दर्शन घडते. रसिकांना घडवण्याचे, समृद्ध करण्याचे काम यातून होत आहे. त्रिकाल सत्य सांगणाऱ्या या कविता आहेत,” असे प्रतिपादन ज्येष्ठ कथा-कादंबरीकार व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे यांनी केले.

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे व न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस आयोजित प्रसिद्ध कवी, लेखक फ. मु. शिंदे यांच्या ‘त्रिकाल’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी कवी फ. मु. शिंदे, लीलाताई शिंदे, विडंबनकार, पटकथा लेखक-दिग्दर्शक रामदास फुटाणे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, लेखक-समीक्षक डॉ. रमेश वरखेडे, लेखक-समीक्षक प्रा. डॉ. राजशेखर शिंदे उपस्थित होते. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे आणि न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजिला होता. सभागृहात साहित्यिक राजन लाखे, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, वि. दा. पिंगळे, कवयित्री डॉ. संगीता बर्वे, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, संवाद पुणेचे सुनील महाजन, माधव राजगुरू, सतीश पिंपळगावकर यांच्यासह साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

डॉ. पी. डी. पाटील म्हणाले, “फ. मु. शिंदे यांनी मराठी साहित्य क्षेत्रात अतुलनीय योगदान दिले आहे. त्यांच्या ‘आई’ या कवितेने महाराष्ट्रातील प्रत्येक रसिकाला भारावून टाकले आहे. साहित्य संमेलन, साहित्यिकांच्या सहवासातून साहित्य क्षेत्रात योगदान देण्याचा आमचा प्रयत्न आहे. चांगल्या साहित्यकृतीला प्रोत्साहन देऊन त्याचा प्रचार व प्रसार करण्याचे भाग्य आम्हाला लाभत आहे. गंभीर विचारांची प्रतिभा असलेला, सामान्य माणूस, शेतकरी, कष्टकरी यांना जोडणारा, समाजभान असलेला हा कवी आहे. त्यांच्या विचार व भावविश्वाची ओळख रसिकांना होते. सामाजिक भाष्य करणाऱ्या, विद्रोहाची मांडणी असलेल्या या कविता आहे. वैचारिक व चिंतनशील स्वरूपाच्या या रचना समाजाला प्रबोधनपर असून, रसिकांना अंतर्मुख करायला लावतात. रसिकांशी संवाद करणारी त्यांची कविता आहे.”