पुरोगामी पक्ष संघटनांच्या आवाहनास मोठा प्रतिसाद, लाखांमध्ये सहाय्य
पुणे दि.3 – मे मध्ये सुरू झालेला पाऊस थांबायला तयार नाही. मराठवाड्यासारखा सारख्या दुष्काळप्रवण प्रदेशात पावसाळ्यातही जेमतेम पडणारा पाऊस काळ बनून आला आहे. केवळ पीकच नाही तर पिकाखालची जमिनही वाहून गेली आहे. न भूतो अशा प्रकारचं हे ओल्या दुष्काळाच संकट सरकारने गांभीर्याने घेतलं पाहिजे.
पावसाने सगळं वाहून गेलेल्या राज्यात दुष्काळ ओला की सुका, त्यासाठी नियमात काय तरतूद आहे? असे शब्दांचे खेळ न करता संकटग्रस्तांबरोबर उभ राहिल पाहिजे. तशी मानसिकता ठेवली पाहिजे. सरकारला सुद्धा अंतकरण असतं. ते असेल तर दुष्काळ ओला की कोरडा हा प्रश्न पडत नाही. या शब्दात समाजसेवक डॉ बाबा आढाव यांनी राज्य व केंद्र सरकारचा समाचार घेतला. महात्मा गांधी जयंती दिवशी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, अतिवृष्टीग्रस्तांना मदतीसाठी देणगी स्वीकारण्यासाठी म. गांधी पुतळा पायाशी डॉ. आढाव व पुरोगामी पक्ष संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर यांची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, संकट केवळ अतिवृष्टी आणि ओल्या दुष्काळाच नाही. तर राज्यकर्त्यांच्या मानसिकतेच जास्त आहे. आधी विरोधी पक्षात असताना ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करणारे, सत्तेत आल्यावर, नियमांमध्ये अशा प्रकारची तरतूद नाही असं बोलायला लागल्यावर भरवसा कुणावर ठेवायचा हा प्रश्न पडतो. सरकार पाडण्यासाठी पैशांचा पाऊस पाडणारे, खऱ्या पावसाने थैमान घातल्यानंतर हात वर करत असतील तर ते अतिशय गंभीर आहे.ओल्या दुष्काळग्रस्तांना मदतीसाठी सरकारने बहाणे करू नयेत. तसेच कुठलाही मुद्दा प्रतिष्ठेचा न करता, सर्वांचे सहकार्य घ्यावे.
पुरोगामी पक्ष संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने आज सकाळी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून बैठकीला सुरुवात करण्यात आली. सुरुवातीलाच डॉक्टर आढाव यांच्या हाकेला नेहमी पहिला प्रतिसाद देणाऱ्या हमाल पंचायतीच्या विविध संस्थांच्या वतीने मदतीचे धनादेश डॉक्टर आढाव यांच्या सुपूर्द करण्यात आले. हमाल पंचायतीच्या मजूर संस्था, पतसंस्था, हमाल व्यापारी ट्रान्सपोर्ट तरुण मंडळ, पथारी व्यावसायिक पंचायत, मोलेदिना हॉल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भुयारी पथारी पंचायत, रिक्षा पंचायत संघटना व रिक्षा पंचायत नागरी सहकारी पतसंस्था, अंगणवाडी कर्मचारी सभा, अंगणवाडी कर्मचारी नागरी सहकारी पतसंस्था, हमाल पंचायत,लोणावळा, भुसार विभागातील तोलणार, हमाल पंचायत रेल्वे मालधक्का पार्सल विभाग, मुस्लिम सत्यशोधक मंडळ, संविधान जागर अभियान, पवन पायगुडे यांची स्वान इंडस्ट्री या संस्थांबरोबरच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुखांपासून ते कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतीमध्ये काम करणारे, हमाल पंचायतीत काम करणारे कर्मचारी, अंगणवाडी ताई, घर कामगार महिला यांनीही वैयक्तिक पातळीवर मदत निधी मध्ये आपला सहभाग दिला. ज्ञानेश्वरी पवार या चिमुकलीने आपल्या खाऊच्या पैशातून मदत दिली. एकूण दीड लाख रुपये धनादेशाद्वारे तर पन्नास हजार रुपये रोख अशी दोन लाख रुपयांची मदत गोळा झाली.
दरम्यान ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी जी. जी. पारीख यांच्या निधनाचे वृत्त बैठक स्थळी येताच त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी समितीचे निमंत्रक नितीन पवार यांनी ही बैठक करण्यामागील भूमिका सांगितली. ते म्हणाले, आमच्यासारखे सत्ताधारी पक्षाचे वैचारिक विरोधक सरकारला या भीषण संकटात सर्व ते सहकार्य करायला तयार आहेत. सरकारचा पदर जर अपुरा पडला तर जनतेतून पुरोगामी पक्ष संघटना आणि राष्ट्रीय एकात्मता समिती निधी उभा करेल. त्याची सुरुवात आज महात्मा गांधी पुतळ्यापासून केली आहे.
काँग्रेसचे पदाधिकारी अरविंद शिंदे,मोहन जोशी,अभय छाजेड, आप पक्षाचे पदाधिकारी मुकुंद कीरदत,समाजवादी पक्षाचे दत्ता पाकिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. सुनील जगताप,राष्ट्रीय जन आंदोलनाच्या समन्वयक सुनीती सु र, मराठी विज्ञान परिषदेचे विनर र र, हमाल पंचायतीचे सरचिटणीस गोरख मेंगडे, खजिनदार पंचायतीचे चंद्रकांत मानकर, व्यवस्थापक हुसेन पठाण, पदाधिकारी विष्णू गरजे,महात्मा फुले प्रतिष्ठानच्या सरचिटणीस अँड शारदा वाडेकर,बांधकाम मजदूर सभेचे अध्यक्ष ऍड मोहन वाडेकर, महेश बनकर, काकी उर्फ कमल पायगुडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ॲड नाथा शिंगाडे, सीपीआयचे अरविंद जक्का, पथारी व्यावसायिक पंचायतीचे मोहन चिंचकर, टेम्पो पंचायतीचे ओंकार मोरे, हनुमान खंदारे, तोलणार संघटनेचे किशोर भानुसगरे, प्रदीप मारणे, कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतीचे हर्षद बर्डे, रिक्षा पंचायतीचे खजिनदार प्रकाश वाघमारे व पदाधिकारी सिद्धार्थ चव्हाण,पतसंस्थेचे उपाध्यक्ष यासीन सय्यद, अर्जुन लोखंडे, हरून सय्यद आधी पदाधिकारी प्रतिनिधी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर भुयारी मार्ग पथारी पंचायतीने स्थानिक संयोजन केले.














































