अजमेर, दि. १४ (पीसीबी) – हिंदू देव दैवतांच्या अस्तित्वावर सवाल उपस्थित केला आहे. या वादावर देश-विदेशातून प्रतिक्रिया उमटत आहेत. या सगळ्या वादात अजमेरमध्ये असलेला सूफी संत ख्वाजा मोईनीदुद्दीन हसन चिस्ती यांचा दर्गाही अनेक कारणांमुळे गेल्या काही दिवसांत चर्चेत आहे. या दर्ग्याशी संबंधित असलेले खादिम आणि अंजुमन कमिटीचे सचिव सरवर चिश्ती यांचा नुपुर शर्मा यांच्यावर टिप्पणी करणारा वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता सरवर चिश्ती यांचा मुलगा आदिल चिश्ती यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
यात आदिल चिश्ती हिंदू धर्माच्या देवी देवतांबाबत टिप्पणी करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हारल झाल्यानंतर यावर आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. विश्व हिंदू परिषदेने सरवर चिश्ती आणि त्यांचे पुत्र आदिल चिश्ती यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. दर्ग्याशी संबंधित खादिमचा व्हिडीओ व्हायरल होण्याची ही चौथी वेळ आहे. २३ जून रोजी आदिल चिश्ती यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हाय़रल केल्याची माहिती आहे. आता या व्हिडीओ प्रकरणानंतर पोलीस अलर्ट मोडवर आहेत. यापूर्वी आदिल यांचे वडील सरवर चिश्ती यांचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. त्यात अन्यायाविरोधात मुस्लीम मोठे आंदोलन करणार असल्याची घोषणा करण्यात आली होती.