अंजली दमानिया यांच्या खात्यावर तब्बल २५ कोटी रुपयांचा बॅलन्स

0
10

दि २१ ( पीसीबी ) – राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात रान पेटवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या खात्यावर तब्बल २५ कोटी रुपयांचा बॅलन्स टाकण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी केला आहे.

अंजली दमानिया यांनी सरपंच संतोष देशमुख हत्याकांड व कृषि घोटाळ्यावरून मंत्री धनंजय मुंडे यांची पुरती कोंडी केली आहे. त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर मंत्रिमंडळाची मंजुरी नसताना खोटा शासन आदेश काढून कृषि खात्याची शेकडो कोटींची रक्कम लाटल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर सूरज चव्हाण यांनी उपरोक्त इशारा दिला आहे. सूरज चव्हाण यांनी यासंबंधीची माहिती पुराव्यांसकट उघड करण्याचा इशाराही दमानिया यांना शुक्रवारी (दि., २१) दिला.

धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करण्यासाठी रिचार्जवाल्या ताईच्या खात्यावर २५ खोक्यांचा बॅलन्स टाकण्यात आला आहे. काहीही काम न करता वर्षाला १५ देश फिरणाऱ्या आणि अडीच कोटी रुपयांचा टॅक्स भरणाऱ्या स्वयंघोषित समाजसेविका ताई, कोणाच्या माध्यमातून तुमचा रिचार्ज झाला हे आम्ही पुराव्यांसह लवकरच बाहेर काढू, असा इशारा सूरज चव्हाण यांनी आपल्या एका पोस्टद्वारे दिला आहे.

दुसरीकडे, अंजली दमानिया यांनी कृषि खात्यातील कथित घोटाळ्यावरून केलेल्या आरोपांना धनंजय मुंडे यांनी एका विस्तृत पोस्टद्वारे प्रत्युत्तर दिले आहे. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप आणि सोलर लाईट ट्रॅप यांचा पुरवठा करण्याबाबत निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयावर अंजली दमानिया यांनी केलेले दावे हे संपूर्णपणे चुकीचे, खोटे व केवळ माझी बदनामी करण्याच्या हेतूने प्रेरित आहेत. मुख्य सचिव तथा मंत्रिमंडळ सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांनी ३० सप्टेंबर २०२४ रोजी माननीय मुख्यमंत्री महोदयांची मान्यता झाल्यानंतर २३ सप्टेंबर २०२४ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीचे इतिवृत्त निर्गमित केलेले आहे.

त्यामध्ये कृषी विभागाच्या खरेदी व थेट पुरवठ्याला मान्यता देण्यात आलेली आहे. यासंदर्भातील जो पेपर व्हायरल झाला आहे, त्याला त्या तारीख नसलेले सहीचे पत्र म्हणतात ते वास्तविकत: मंत्री, कृषी म्हणून स्वतःच्या विभागाच्या सचिवांना निर्गमित केलेले टिपण आहे. टिपणावर दिनांक टाकण्याचा प्रघात नाही तथापि सदर टिपणावर ते ज्याला मार्क केलेले आहे त्याची स्वाक्षरी व त्याला प्राप्त झाल्याचा व कार्यासनात प्राप्त झाल्याचा दिनांक नमूद असतो.

विशेष म्हणजे या शासन निर्णयान्वये व मंत्रिमंडळ निर्णयान्वये मान्यता प्राप्त झालेली खरेदी अद्यापही झालेली नाही. त्याची प्रक्रिया सुरू आहे. दमानिया यांनी नेहमीप्रमाणे अर्धवट कागदपत्रांच्या आधारे जे आरोप केलेले आहेत ते संपूर्णतः खोटे व फक्त मीडिया ट्रायल करण्यासाठी आहेत, असा दावा धनंजय मुंडे यांनी केला आहे.

माझे बँक खाते तपासा; दमानियांचे प्रत्युत्तर
अंजली दमानिया यांनी सूरज चव्हाण यांचे आरोप धूडकावून लावत सरकारला थेट आपले बँक अकाउंट तपासण्याचे आव्हान दिले आहे.दुसरीकडे, अंजली दमानिया यांनी या प्रकरणी सरकारला आपले खाते तपासण्याचे खुले आव्हान दिले आहे. आपला संताप व्यक्त करताना त्या म्हणाल्या, ‘‘खूप राग आला आहे, तरीही मी माझ्या भाषेची पातळी सोडणार नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांना माझा थेट आव्हान. ताबडतोब माझी सगळीच्या सगळ्या खाती सरकारने तपासावी. कुठेही एक दमडीदेखील बेनामी आहे का, ते पाहावे.’’