पिंपरी, दि. ०३ (पीसीबी) : पिंपरी चिंचवड शहर फक्त उद्योगनगरी न राहता आता आयटीनगरी झाली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये दिवसेंदिवस हरित क्षेत्र कमी होत चालले आहे. रावेत, मोशी, चिखली, ताथवडे या भागात अनेक नवीन बिल्डींग्स उभ्या राहत आहेत. त्यात हवामान बदलाचा फटका सर्वांना बसत आहे. कुठे अतिवृष्टी तर कुठे दुष्काळाचे चित्र पाहायला मिळते. या सर्वांवर उपाय म्हणजे झाडे लावणे. आणि म्हणूनच अंघोळीची गोळी संस्थेकडून “एक झाड,एक सोसायटी ” हा उपक्रम सुरु करण्यात आला. रावेत या भागातून या उपक्रमाची सुरवात झाली.अंघोळीची गोळी संस्था प्रत्येक सोसायटीला एक झाड लावून देणार आहे. तसेच ते झाड सोसायटीच्या मदतीने जोपसणार सुद्धा आहे.
“एक झाड, एक सोसायटी ” या उपक्रमाद्वारे लोक एकत्र येऊन झाडांची काळजी घेतील हा उद्देश अंघोळीची गोळी संस्थेचा आहे असे शहर समन्वयक राहुल धनवे म्हणाले. सोसायटीने झाड लावून आपल्या पृथ्वीच्या काळजीसाठी एकत्र आल्याने पृथ्वीला जडलेल्या ‘हवामान बदल’ या आजाराविरुद्ध सर्वांनी ‘हवामानठोसा’ दिला आहे. लोकांना एकत्रित आणून अनेक पर्यावरणपूरक उपक्रम राबवायचे आहेत असे धनवे म्हणाले.
याचाच एक भाग म्हणून मयूर समृद्धी,आकुर्डी सोसायटीमध्ये काल वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मयूर समृद्धी संस्थेचे पदाधिकारी,रहिवाशी,दिव्यश्री सामाजिक संस्थेच्या नयना धनवे, संदीप रांगोळे आदी उपस्तिथ होते.