अँन्टी इन्कम्बन्सीमुळे तुमचे अर्धे उमेदवार बदला…, भाजपच्या सुचनेमुळे शिंदे, पवार गटात मोठी खळबळ

0
28

मुंबई, दि. १३ : विधानसभा निवडणुकीला अधिकाधिक यश मिळवण्यासाठी निम्म्याहून जास्त जागांवर उमेदवार बदलण्याच्या सूचना भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केली आहे. शिवसेनेच्या बऱ्याच आमदारांबद्दल अँटी इन्कम्बन्सी आहे. या जागा गमावणं महायुतीला परवडणारं नसल्याचं भाजप नेतृत्त्वानं शिंदे आणि पवार यांना अगदी स्पष्ट सांगितल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, अंतिम सर्वेक्षणाचा हवाला देत ही सुचना केल्यामुळे शिंदे आणि पवार यांचे अर्धेअधिक आमदार आताच बाद होत असून तोडिस तोड असे नवीन उमेदवार द्यावे लागणार आहेत.

लोकसभा निवडणुकीवेळी जागावाटपाच्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री शिंदेंना बरीच मेहनत करावी लागली. बरीच रस्सीखेच केल्यानंतर शिंदेसेनेला १५ जागा मिळाल्या. त्यानंतर शिंदेंनी उमेदवार घोषित केल्यानंतर काही ठिकाणी भाजपनं त्यांना उमेदवार बदलायला लावले. लोकसभा निवडणुकीवेळी भाजपनं शिंदेंना अंतर्गत सर्व्हे दाखवले. त्याच जोरावर भाजपनं त्यांना अधिक जागा देण्यास नकार दिला. सर्व्हेंचा दाखला देत हिंगोलीसारख्या ठिकाणी जाहीर केलेले उमेदवार बदलायला लावले. यवतमाळ-वाशिममध्ये भावना गवळींची उमेदवारी रोखली. तिथे वेगळा उमेदवार द्यायला लावला. लोकसभा निवडणुकीवेळी वापरण्यात आलेलं अंतर्गत सर्व्हेंचं अस्त्र भाजपनं विधानसभेच्या तोंडावर पुन्हा बाहेर काढलं आहे. राज्यातील सुरक्षा आणि नक्षलवादाच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी बोलावलेल्या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. विशेष म्हणजे गृह मंत्रालयाची जबाबदारी सांभाळणारे देवेंद्र फडणवीस बैठकीला गैरहजर होते. या बैठकीनंतर शिंदेंनी शहांना १२० जागांची यादी दिली. महायुतीला सत्तेत पुन्हा यायचं असल्यास शिंदे आणि अजित पवार यांनी अधिक जागांची मागणी केली आहे. वास्तव चित्र दाखविण्यासाठी भाजपने सर्वेक्षणाचे अस्त्र उपसले आहे.
भाजप नेतृत्त्वानं जागावाटपाबद्दल शिंदे आणि पवार यांना कोणताही शब्द दिलेला नाही. पण शिवसेनेला ९०, तसेच पवार यांच्या राष्ट्रवादीला ५० ते ५५ पेक्षा अधिक जागा देता येणार नाहीत, असं भाजपकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे. शहांनी शिंदे आणि पवार यांच्या हाती भाजपचा अंतर्गत सर्व्हे सोपवला. ‘शिवसेना आणि अजित दादांच्या बऱ्याच आमदारांबद्दल जनमत नकारात्मक आहे. त्यांना पुन्हा तिकीट देण्यात आल्यास निवडणुकीत त्यांचा सपाटून पराभव होईल, असं भाजप नेतृत्त्वाकडून सांगण्यात आलं’ अशी माहिती सुत्रांनी दिली.
अँटी इन्कम्बन्सी असलेल्या आमदारांची तिकिटं कापा. त्यांना संधी देऊ नका. त्यांच्या जागी तरुण आणि नव्या चेहऱ्यांना संधी द्या, अशा सूचना शिंदे- पवार यांना भाजप नेतृत्त्वाकडून देण्यात आल्या. अजित पवार राजी आहेत मात्र, शिंदेंना ही सूचना पटलेली नाही. ते याबद्दल नाखूष आहे. या निर्णयामुळे निवडणुकीवेळी लोकांमध्ये चुकीचा संदेश जाईल, असं शिंदेंना वाटतं. याच कारणामुळे नाखूष झालेल्या शिंदेंनी कॅबिनेटची बैठक प्रकृतीचं कारण देऊन रद्द केल्याची माहिती सुत्रांनी दिली.
यापूर्वी भाजपने त्यांच्या सर्वेक्षण अहवालानुसार अगदी मुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार यांच्या उमेदवारीला कात्री लावल्याची अनेक उदाहरणे आहेत. महाराष्ट्रात विधानसभा सर्वेक्षणात महाविकास आघआडी पुढे असल्याने भाजपने आता आपली व्युहरचना पूर्णतः बदलायचा निर्णय घेतला आहे. हरियाणा विधानसभा निकालातून अनेक नवनवे डावपेच आखण्यात आले असून शिंदे आणि अजित पवार यांनी अर्धे अधिक उमेदवार बदलायला लावणे हा त्याचाच एक भाग असल्याचे सांगण्यात आले.