स्वप्नील कुसळेने इतिहास रचला, नेमबाजीत ५० मीटर रायफल स्पर्धेत थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदक

0
84

दि. १ ऑगस्ट (पीसीबी) – भारताच्या स्वप्नील कुसळेने आश्चर्यकारक कामगिरी करत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. त्याने नेमबाजीत ५० मीटर रायफल स्पर्धेत थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदक पटकावले आहे. स्वप्नीलने ५० मीटर रायफल स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. त्याचा एकूण स्कोर ४५१.४ होता. तो खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारा महाराष्ट्राचा दुसरा खेळाडू ठरला आहे. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने एकूण तीन पदके जिंकली आहेत. तिन्ही पदके नेमबाजीत आली आहेत. स्वप्नीलपूर्वी मनू भाकेरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकले होते. त्याचवेळी सरबज्योतसह मनूने १० मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात कांस्यपदक जिंकले.

ऑलिम्पिकच्या आतापर्यंतच्या इतिहासात वैयक्तिक पदक मिळवणारे मराठमोळे खेळाडू म्हणून केवळ खाशाबा जाधव यांना यश आले होते. हेलसिंकी १९५२ सालच्या ऑलिम्पिकमध्ये खाशाबा यांनी कुस्तीत ऐतिहासिक कांस्यपदक जिंकले होते. आता असाच पराक्रम करून दुसरा मराठमोळा खेळाडू स्वप्नील बनला आहे. विशेष म्हणजे, हे दोन्ही खेळाडू कोल्हापूरचे असून, ऑलिम्पिकमधील या विशेष योगायोगची चर्चा सुरु आहे.

कोण आहे स्वप्नील कुसळे?
स्वप्नील कुसळे हा कोल्हापूरमधील करवीर तालुक्यातील कांबळवाडी येथील रहिवासी असून तो शेतकरी कुटुंबातील आहे. स्वप्नीलने २००९ मध्ये शूटिंगला सुरुवात केली. त्याच्या वडिलांनी त्याला महाराष्ट्राच्या प्राथमिक क्रीडा प्रबोधिनीमध्ये दाखल केले आणि वर्षभरानंतर स्वप्नीलने नेमबाजीला आपले करिअर म्हणून निवडले. शूटिंगमध्ये झोकून दिल्यानंतर स्वप्नीलने मागे वळून पाहिले नाही आणि २०१३ मध्येच त्याला लक्ष्य स्पोर्ट्सकडून प्रायोजकत्व मिळाले.

नेमबाज नाही, तर धोनी स्वप्नीलचा आदर्श –
ऑलिम्पिक स्पर्धेत ५० मीटर थ्री पोझिशन प्रकारात अंतिम फेरी गाठणाऱ्या कोल्हापूरच्या स्वप्नील कुसळे एखाद्या नेमबाजाला नाही, तर भारताचा माजी क्रिकेट कर्णधार महेंद्रसिंह धोनीला आपला आदर्श मानतो. धोनीच्या मैदानातील शांत आणि संयमी स्वभाव शैलीचा आपल्यावर कमालीचा प्रभाव असल्याचे स्वप्नीलने आपल्या पात्रता फेरीच्या कामगिरीनंतर सांगितले. योगायोग म्हणजे स्वप्नील धोनीप्रमाणे रेल्वेत तिकीट तपासनीस म्हणून नोकरी करतो.

स्वप्नील काय म्हणाला?
तो म्हणाला, ‘‘मला रेंजवर शांत आणि संयमी राहायला आवडते. मी फारसा बोलत नाही. अचूक नेमबाजीसाठी शांत आणि संयम या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळेच मी धोनीचा प्रचंड चाहता आहे. क्रिकेटच्या मैदानावर सामना सुरू असताना कितीही मोठे दडपण असले, तरी धोनीचा संयम सुटलेला कधीही पाहिला नाही. मलाही असेच राहणे आवडते,’’ असेही स्वप्निल म्हणाला.