“स्त्रियांच्या साहित्याला दुय्यम स्थान!” – डॉ. संगीता बर्वे

0
168

पिंपरी,दि. २० (पीसीबी) – “आजच्या आधुनिक काळातही स्त्रियांच्या साहित्याला दुय्यम स्थान दिले जाते!” अशी खंत साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ कवयित्री डॉ. संगीता बर्वे यांनी ‘स्त्रियांचे साहित्यातील योगदान’ या विषयावरील परिसंवादात अध्यक्षीय मनोगत मांडताना व्यक्त केली. ना. धों. महानोर साहित्यनगरी (जयगणेश बँक्वेट हॉल), नवीन देहू – आळंदी रस्ता, मोशी येथे रविवार, दिनांक १९ नोव्हेंबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय दुसऱ्या इंद्रायणी साहित्य संमेलनातील पाचव्या सत्रात इंदुमती जोंधळे, डॉ. अपर्णा महाजन, डॉ. लता पाडेकर यांनी परिसंवादात सहभाग घेतला होता. याप्रसंगी संमेलनाध्यक्ष सोपान खुडे, स्वागताध्यक्ष गणेश सस्ते, इंद्रायणी साहित्य परिषदेचे अध्यक्ष संदीप तापकीर, समन्वयक अरुण बोऱ्हाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी डॉ. लता पाडेकर यांनी स्त्रीसाहित्याचा मागोवा घेताना महानुभाव पंथातील चक्रधर स्वामींच्या महिला शिष्यांनी सर्वप्रथम साहित्यात योगदान दिले, अशी माहिती दिली. वास्तविक त्या काळात पाश्चिमात्य देशांतही स्त्रियांना लेखनाची मुभा नव्हती, असे नमूद करून त्यांनी गार्गी, मैत्रेयी यांनी स्वतंत्रपणे साहित्य अभिव्यक्ती केल्याचे सांगितले.‌ साहित्यनिर्मितीत संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई यांनी मौलिक योगदान दिले आहे, अशीही माहिती डॉ. पाडेकर यांनी दिली.

डॉ. अपर्णा महाजन यांनी महिला सबलीकरणाची बीजे स्त्री संतांच्या साहित्यांत असल्यानेच महिला सक्षमीकरणाचा मार्ग मोकळा झाला, असे मत मांडले. ताराबाई शिंदे यांनी त्यापासून लेखनाची प्रेरणा घेतली, असेही त्यांनी सांगितले. इंदुमती जोंधळे यांनी आपला जीवनपट मांडून, “सावित्रीबाई यांना उभे करण्याचे काम जोतिबांनी केले असले तरी प्रत्येकीला जोतिबा मिळेलच असे नाही!” हे वास्तव मांडले.‌

डॉ. संगीता बर्वे पुढे म्हणाल्या की, “परिसंवादात पारंपरिक स्त्रियांची मानसिकता, सामंजस्य, प्रखर स्त्रीवाद असे विविध विचार मांडले गेले असले तरी ते वास्तव स्वीकारायला पुरुषी मानसिकता सहजासहजी तयार होत नाही. इतकेच नव्हे तर स्त्रियांनाही त्यात काही वावगे वाटत नाही. पुरुषी अहंकार आणि प्रपंचातील जबाबदारी सांभाळून स्त्री लेखन करीत असते. मानसिक घुसमट सहन करीत तावून सुलाखून बाहेर येऊन केलेली तिची अभिव्यक्ती गौण ठरवली जाते. वास्तविक एखाद्या प्रकाशमान लोलकासारखी ही बहुरंगी स्वानुभूती असते; परंतु ती पचवायला समाजाला खूप जड जाते!” असे कटू सत्य अधोरेखित केले. आपल्या मनोगतातून त्यांनी स्त्री जाणिवांच्या कविता सादर करून श्रोत्यांना अंतर्मुख केले.
डॉ. सीमा काळभोर यांनी सूत्रसंचालन केले; तर डॉ. पौर्णिमा कोल्हे यांनी आभार मानले.