नवी दिल्ली, दि. ६ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका कुणाचा यावर आज निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. यावरून पक्षचिन्ह आणि पक्ष कोणाकडे ठरणार असलं तरी त्याआधीच शरद पवार गटाच्या अडचणी वाढणार असं चित्र आहे. अजित पवार गटाच्या दाव्यानुसार, संख्याबळ असणाऱ्यालाच पदाधिकारी निवडीचा अधिकार आहे.
पक्षात यापूर्वी झालेल्या नियुक्त्या पक्ष घटनेला धरून नाहीत. संख्याबळ ज्या प्रमाणे असेल त्यांना पदाधिकारी नियुक्ती करण्याचे अधिकार आहेत, असं अजित पवार गटाकडून सांगण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा गेला आहे. त्यामुळे आमदारांची संख्याच आता महत्त्वाची आहे. त्याआधारेच पक्ष कोणाचा? हे ठरवता येईल, असंही अजित पवार गटाचे म्हणणे आहे.
दरम्यान आमच्यासोबत ५३ पैकी ४२ आमदार आमच्याकडे आहे. राज्यसभा आणि लोकसभेतील प्रत्येकी एक खासदार आमच्याकडे असल्याचा दावा अजित पवार गटाने केला आहे. तर शरद पवार गटाने अजित पवार यांच्यासह ९ जणांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावेळी अजित पवार गटाकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं आहे.










































