शनिवारी भक्ती- शक्ती चौकातील वाहतुकीत बदल

0
479

निगडी, दि. १५ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरात एकाच वेळेस २००० ढोल, ५०० ताशाचे एकत्रित वादन होणार असून, यावेळी ३५० भगवे ध्वज देखील फडकणार आहेत. या कार्यक्रमाला २० हजार नागरिक येण्याची शक्यता असून, त्यामुळे भक्ती- शक्ती चौकातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

अखिल पिंपरी-चिंचवड शिवजयंती समन्वय समिती व पिंपरी-चिंचवड ढोल ताशा महासंघाच्या वतीने भक्ती शक्ती शिल्प स्मारक, निगडी येथे शनिवारी (१६ सप्टेंबर) ढोल-ताशा वादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर निगडी वाहतूक विभागांतर्गत भक्ती-शक्ती चौक आणि परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. हा बदल शनिवारी दुपारी दोन ते कार्यक्रम होईपर्यंत असणार आहे.

भक्ती-शक्ती स्मारक येथे २००० ढोल, ५०० ताशांचे वादन होणार आहे. यावेळी ३५० भगवे ध्वज देखील फडकणार आहेत. या कार्यक्रमासाठी सुमारे २० हजार लोक उपस्थित राहणार असल्याची शक्यता आयोजकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे भक्ती चौक परिसरातील वाहतूक वळविण्यात आली आहे. याबाबतचे आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिले आहेत.

देहूरोडकडून येणारी वाहतूक भक्ती- शक्ती चौकात न येता उड्डाणपुलावरून ग्रेड सेपरेटरमधून जाऊन रुद्रा पार्किंगच्या समोरील आउटमधून बाहेर पडून इच्छित स्थळी जाईल. त्रिवेणीनगर चौकाकडून येणारी वाहतूक भक्ती-शक्ती पुलावरून न जाता डाव्या बाजूने टिळक चौक तसेच भक्ती-शक्ती भुयारी ब्रिजच्या खालून अप्पूघर मार्गे जाईल. अप्पूघर / रावेतकडून येणारी वाहतूक व ट्रान्सपोर्ट नगर मधून येणारी वाहतूक भक्ती-शक्ती ब्रिजवर न चढता ती भक्ती-शक्ती भुयारी ब्रिजच्या खालून अंकुश चौक मार्गे जाईल. संभाजी चौकाकडून भक्ती-शक्ती चौकाकडे येणारी वाहतूक ही भक्ती-शक्ती ब्रिजवर न चढता भेळ चौक येथे लोकमान्य हॉस्पिटल मार्गे टिळक चौकातून जाईल.

काचघर चौकाकडून भक्ती-शक्ती चौकाकडे येणारी वाहतूक भक्ती-शक्ती ब्रिजवर न चढता काचघर चौकातून उजव्या बाजूने गांधी हॉस्पिटलमार्गे टिळक चौक येथून जाईल. टिळक चौकाकडून भक्ती-शक्ती चौकाकडे येणारी वाहतूक भक्ती-शक्ती चौकाकडे न येता एसबीआय समोरील ग्रेडसेपरेटर मार्गे भक्ती-शक्ती उड्डाणपुलावरून देहूरोड मार्गे जाईल. कार्यक्रम संपताच वाहतूक पूर्ववत करण्यात येणार आहे.