विरुद्ध दिशेने जाणाऱ्या बसची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू, दोन जखमी

0
698

चिंचवड, दि. २६ (पीसीबी) – विरुद्ध दिशेने जाणाऱ्या बसने समोरून येणाऱ्या एका दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला. तर दोघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी (दि. 24) सायंकाळी साडेसात वाजता आकुर्डी लिंकरोड, चिंचवड येथे घडली.

अनिकेत बालाजी गायकवाड (वय 21) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. स्वप्नील संजय पवार (वय 19, रा. ओटास्कीम, निगडी), शुभम गायकवाड अशी जखमींची नावे आहेत. स्वप्नील पवार यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बस (एमएच 14/सीडब्ल्यू 4136) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पवार आणि त्यांचे मित्र अनिकेत गायकवाड, शुभम गायकवाड हे दुचाकीवरून आकुर्डी लिंकरोडने जात होते. त्यावेळी समोरून विरुद्ध दिशेने आलेल्या बस चालकाने त्याच्या ताब्यातील बसने पवार यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये पवार यांना मुकामार लागला. शुभम गायकवाड हा जखमी झाला. तर अनिकेत गायकवाड याच्या छाती, पोट, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा त्यात मृत्यू झाला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.