विनेश फोगाटच्या कुटुंबियांकडून गंभीर आरोप

0
133

दि. ७ ऑगस्ट (पीसीबी) – भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट हिने पॅरिस ऑलम्पिकच्या महिला कुस्तीच्या 50 किलो गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. विनेशने उपांत्य फेरीत क्युबाच्या युस्नेलिस गुझमनचा पराभव करून अंतिम फेरीत धडक दिली होती. देशभर तिच्या कामगिरीचा जल्लोष केला जात असतानाच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विनेश फोगाट हिला ऑलिम्पिक स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आलं आहे.यामुळे भारताला मोठा धक्का बसला आहे.कुस्तीपटूचे वजन मर्यादेपेक्षा अंदाजे 100 ग्रॅम जास्त आहे, ज्यामुळे तिला अपात्र ठरवले आहे. स्पर्धेच्या नियमांनुसार, फोगट रौप्य पदकासाठीही पात्र होणार नाही आणि 50 किलोमध्ये फक्त सुवर्ण आणि कांस्यपदक विजेते असतील. यावरुन आता राजकारण सुरु झालं आहे. विनेशच्या कुटुंबियांनी थेट फेडरेशनवर गंभीर आरोप केले आहेत.

फेडरेशनने तिच्याविरोधात कारस्थान रचल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. विनेश फोगाटचे सासरे राजपाल राठी म्हणाले की, “डोक्यावरच्या केसांमुळे सुद्धा 100 ग्रॅम वजन वाढतं, 100 ग्रॅम वजन किती जास्त असतं?” याचबरोबर त्यांनी भारतीय कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख बृज भूषण शरण सिंह यांच्यावर देखील निशाणा साधत आरोप केले आहेत.

कॉँग्रेसकडून संतप्त प्रतिक्रिया
त्यांनी थेट सरकार आणि बृज भूषण शरण सिंह यांचा यामागे हात असल्याचा आरोप केला आहे. “अजून विनेश फोगाट बरोबर मी बोललेलो नाही. विनेशने वारंवार म्हटलय माझ्याविरोधात षडयंत्र रचण्यात आलंय. जयपूर आणि अन्य ठिकाणी ती या बद्दल बोलली आहे. तसंच काल फाईट झाली त्यावेळी तिचं वजन जास्त का नव्हत?”, असा सवाल देखील राजपाल राठी यांनी केला आहे.

दरम्यान, या प्रकरणाचे पडसाद संसदेत देखील उमटले आहेत. काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी त्यावर प्रतिक्रिाय दिली आहे. भारताला गोल्ड मेडल भलेही मिळाले नसेल. पण तिने देशाचं मन जिंकलं आहे. तिला जो पुरस्कार मिळाला पाहिजे, तो मिळत नाहीये, याचं मला दु:ख वाटतंय, असं शशी थरूर म्हणाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.”विनेश, चॅम्पियन्समध्ये तू चॅम्पियन आहेस. तू भारताचा अभिमान आहेस आणि प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणा आहेस. आजच्या धक्क्याने मन दुखावलं. मी अनुभवत असलेल्या निराशेची भावना शब्दांत व्यक्त करता येणार नाही. त्याचवेळी मला माहित आहे की तू लवचिकतेचं प्रतीक आहेस. आव्हानं स्वीकारणं हा तुझा नेहमीचा स्वभाव राहिला आहे. आणखी मजबूत बनून परत ये. आम्ही सर्वजण तुझ्या पाठिशी आहोत.”, असं ट्वीट मोदी यांनी केलं आहे.