लोकसभेची सूज विधानसभेला उतरवू

0
100

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) पुणे : उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात डीपीडीसीची बैठक पार पडली. या बैठकीत स्वत: खासदार शरद पवार यांनी उपस्थिती दर्शवली होती, त्यामुळे या बैठकीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागल्याचं दिसून आलं. त्यातच, खासदार अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना थेट निधी वाटपावरुन लक्ष्य केलं. त्यामुळे, दोन्ही नेत्यांमध्ये शा‍ब्दिक खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर, पिंपरी चिंचवडमधील मेळाव्यातूनही खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना लक्ष्य केलं. यावेळी, अमोल कोल्हेंनी अजित पवारांवर टीका करताना, गुलाबी रंगावरुन त्यांना डिवचलं. आता, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी अमोल कोल्हेंवर बोचरी टीका केलीय.

अमोल कोल्हे यांनी आपल्या भाषणातून लाडकी बहीण योजना आणि अजित पवारांचं गुलाबी जॅकेट यावरुन महायुती सरकारवर टीका केली. 1500 रुपयांमध्ये बहुमूल्य मत विकू नका. आता लाडका दादा योजना आणलीये. युवकांना स्टाय पेंड दिले जाणार आहेत. मात्र, ही योजना फक्त सहा महिन्यांसाठी लागू आहे. मग त्यापुढं काय? त्यामुळं स्टायफंड पेक्षा पर्मनंट नोकरी बद्दल युवकांनी विचार करायला हवा, असे कोल्हेंनी म्हटलं होतं. तसेच, काहींनी पिंक कलरला पसंती दिलीय, असे म्हणत जयपूरचा दाखलाही त्यांनी दिला होता. आता, या टीकेला राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी प्रत्त्यु्त्तर दिलंय. घराच्या समोरील रस्ता बनवू न शकणाऱ्यांनी अजित दादांवर बोलू नये. त्यामुळं गुलाबी स्वप्नांवर ही शब्द न काढलेले बरे. तुमची लोकसभेची सूज विधानसभेत उतरवू, अशा शब्दात रुपाली चाकणकर यांनी अमोल कोल्हेंवर पलटवार केला.

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा आज पिंपरी चिंचवडमध्ये होत आहे, येथील भाषणात बोलताना रुपाली चाकणकरांनी कोल्हेंवर बोचरी टीका केली. तर, अजित पवारांनीही गुलाबी रंगावर भाष्य केलं.
अमोल कोल्हेंनी म्हटले होते की, उद्या इथं कोणाचा तरी मेळावा आहे, मात्र मला असं समजलं की मेळावा जयपूरला आहे. कारण काहींनी पिंक कलरला पसंती दिलीये, आता कोणी कोणत्या रंगाला पसंती द्यायची. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. भोसरी विधानसभेत नेमकं काय करायचं? हा खरा प्रश्न होता. पवार साहेबांच्या जादू ने अजित गव्हाणेंसारखे अनेकांची घरवापसी झाली. मुळात लोकसभेच्या प्रचारावेळी शहराध्यक्ष तुषार कामठे भोसरी विधानसभेला वेळ देऊ शकले नाहीत. इतर जबाबदाऱ्यांमुळं त्यांना येता आलं नसेल. त्यामुळं नेमकं विरोधात काम कोणी केलं, हे सांगता येत नाही.
आता मला म्हणतात दादा तुम्ही पिंक कपडे घालायला लागले, आता मला सांगा आज काय पिंक जॅकेट घातलाय का? मला सांगा ह्यांच्या काय पोटात दुखतंय का? आता बघा बरं तुम्ही काय म्हणता, दादा आज लयभारी जॅकेट दिसतंय. तुम्ही फोटो काढता, हे पाहून मग मी परत तेच कपडे घालतो. त्यात काय वाईट आहे, असे अजित पवार यांनी पिंपरीतील भाषणात म्हटले.