लोकसभा निवडणूकीसाठी नेमलेल्या सेक्टर अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

0
159

दि 3 एप्रिल (पीसीबी )- सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेचे तंतोतंत पालन करण्यासाठी निवडणूक कामकाजासाठी नेमलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी काटेकोरपणे लक्ष द्यावे. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी वृद्ध, अपंग, महिला यांचे मतदान त्वरेने होईल याची दक्षता संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे निर्देश मावळ लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दिपक सिंगला यांनी दिले.

मावळ लोकसभा मतदार संघातंर्गत येणाऱ्या चिंचवड विधानसभेच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या वतीने आज थेरगाव येथील स्व. शंकर गावडे कामगार भवन येथे सेक्टर अधिकारी यांच्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सिंगला बोलत होते.

चिंचवड विधानसभा मतदार संघातंर्गत सेक्टर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल जोशी यांनी प्रशिक्षणादरम्यान मतदान प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती दिली. प्रशिक्षणासाठी ४८ सेक्टर अधिकारी, ४८ सहाय्यक आणि ५ राखीव सेक्टर अधिकारी उपस्थित होते. यातील ५ सेक्टर अधिकाऱ्यांना जिल्हा स्तरावर मास्टर ट्रेनर म्हणून प्रशिक्षण देण्यात आले आहे. शिवाय मतदान यंत्राच्या हाताळणीचे देखील प्रशिक्षण त्यांनी घेतले आहे.

मतदान केंद्रावरील संपुर्ण तयारी, मतदानापुर्वीची तयारी, मतदानावेळीची तयारी आणि मतदान प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतरची तयारी याबाबतची सविस्तर माहिती विठ्ठल जोशी यांनी प्रशिक्षणार्थींना दिली. मतदान साहित्य ताब्यात  घेणे आणि जमा करणे याबाबतची देखील माहिती यावेळी देण्यात आली. मतदान केंद्राची स्थिती आणि त्याठिकाणी करावयाच्या उपाययोजना याबाबतची तपशीलवार माहिती तहसीलदार अमोल कदम यांनी दिली. प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष मतदान यंत्र हाताळणीचे प्रशिक्षण कार्यकारी अभियंता बापू गायकवाड आणि उप अभियंता प्रकाश कातोरे यांनी दिले. मतदान यंत्र सिलींग आणि कमिशनिंग याबाबतची माहिती देखील प्रशिक्षणार्थींना देण्यात आली. यानंतर प्रशिक्षणार्थींकडून मतदान यंत्र हाताळणीचे प्रत्यक्ष प्रात्याक्षिक देखील करून घेण्यात आले. प्रशिक्षणासाठी ४० मतदान यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली होती. सेक्टर अधिकाऱ्यांचे समन्वय अधिकारी अजिंक्य येळे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.