मुंबई, दि. २१ (पीसीबी) : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी काँग्रेससह शरद पवार गटाचे आमदार संपर्कात असल्याचा दावा केला आहे. यावर अमोल मिटकरी यांना प्रश्न केला असता ते म्हणाले, जे मी सांगतोय, त्यात काय तथ्य आहे हे लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच समोर येईल. मी जे विधान करतोय त्यावर अनेक जण विरोधी प्रतिक्रिया देतील. काल देवगिरीवर झालेल्या नियमित बैठकीत एका गटाचे दोन महत्त्वाचे पदाधिकारी तेथे भेटून गेले. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्यापूर्वी राज्यात मोठा राजकीय भूकंप झालेला दिसेल, असे म्हणत अमोल मिटकरी यांनी मोठा दावा केलाय. पुढे ते असेही म्हणाले की, अजित पवार यांच्या नेतृत्वात काम करायचे आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचां काम ज्या पद्धतीने महायुती सरकारने केलं त्यामुळे त्यांच्यावर आमचा विश्वास आहे. त्यामुळे काँग्रेस आणि त्या गटातील चार-पाच असे महाभूकंप तुम्हाला लवकरच दिसेल, असं भाकित अमोल मिटकरींनी वर्तविलं आहे.












































