लांन्च्छनास्पद … महिलेला वाचवण्याऐवजी बलात्काराचा व्हिडीओ चित्रीत

0
86

उजैन, दि. ७ – मध्य प्रदेशच्या उज्जैन शहरातील आगर नाका भागात एक संतापजनक घटना घडली आहे. येथे एका कचरा व भंगार वेचणाऱ्या महिलेला जबरदस्तीने मद्यप्राशन करायला लावून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी (४ सप्टेंबर) सदर घृणास्पद घटना घडली. दरम्यान, आरोपी नराधम महिलेबरोबर दुष्कर्म करत असताना रस्त्यावरून अनेक लोक ये-जा करत होते. मात्र हे पादचारी महिलेला वाचवण्याऐवजी बलात्काराचा व्हिडीओ चित्रीत करत होते. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सदर प्रकरण उजेडात आले. आता या प्रकरणी राजकारण पेटले असून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी संताप व्यक्त केला आहे.

प्रियांका गांधी यांनी एक्सवर पोस्ट करत आपला संताप व्यक्त केला. “मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये दिवसा ढवळ्या पथपथावर एका महिलेवर अत्याचार झाले. ही घटना अत्यंत भयावह आहे. आपला समाज कोणत्या दिशेने चालला आहे, हे पाहून संपूर्ण देश सुन्न पडला आहे. माध्यमात आलेल्या बातम्यानुसार रस्त्यावरून जाणारे लोक या घटनेचे चित्रीकरण करण्यात व्यस्त होते. उज्जैनच्या पवित्र भूमिक घडलेल्या या घटनेने मानवतेला काळिमा फासला गेला आहे.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही या घटनेचा निषेध केला. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशच्या सिद्धार्थ नगर येथे घडलेल्या महिला अत्याचार प्रकरणाचाही दाखला देऊन एकूणच महिलांच्या सुरक्षेचा गंभीर मुद्दा उपस्थित केला. एक्स पोस्टमध्ये ते म्हणाले, “उज्जैन आणि सिद्धार्थ नगरमध्ये घडलेली घटना मानवतेला काळिमा फासणारी आहे. महिलांच्या विरोधात वाढत चाललेल्या अत्याचाराच्या घटना आणि त्यावर पोलिसांकडून होणारी ढिलाई ही पीडिता आणि तिच्या कुटुंबियांसाठी फारच क्लेशदायी असते. हा एक गंभीर विषय असून देश यामुळे चिंतातूर आहे. जाहिरातबाजी करणाऱ्या सरकारांनी आपली प्रतिमा उंचावण्यासाठी एका असंवेदनशील अशा व्यवस्थेला जन्म दिला आहे. या व्यवस्थेला महिला बळी पडत आहेत.”