राष्ट्रवादी कोणाची, निवडणूक आयोगापुढे आज सुनावणी

0
211

मुंबई, दि. २४ (पीसीबी) : राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची? याबाबत आता निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडणार आहे. यापूर्वी झालेल्या सुनावणीत अजित पवार गटावरती शरद पवार गटाने गंभीर आरोप केले होते. राष्ट्रीय कार्यकारणीतील सदस्यांची खोटी कागदपत्रे सादर केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. त्यामुळे अजित पवार गटावर कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात आली. आज शरद पवार गटाकडून सविस्तर भूमिका मांडण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना चार तासांचा अवधी दिला गेला आहे. शरद पवार गटाकडून वकील देवदत्त कामत पूर्णवेळ सुनावणी करणार आहेत.

आजच्या सुनावणाीत संख्याबळाचा मुद्दा समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांना वगळून उर्वरित सर्व शरद पवार समर्थक खासदारांना अपात्र करावे अशी मागणी अजित पवार गटाकडून लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेचे सभापती यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यामुळे आता या मुद्द्यावरूनही आयोगासमोर खल होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवार गट नेमकी काय भूमिका मांडणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे अजित पवार गटसुद्धा सक्रिय झालेला दिसून येतो. अजित पावर गटाकडून शरद पवार गटाला नोटीसा पाठवल्या गेल्या होत्या. तर आजच्या सुनावणीत पुढची तारीख मिळेल, तेव्हा अजित पवार गटाला बाजू मांडण्याची संधी देण्यात येणार आहे. शरद पवार यांचं अध्यक्षपद कशाप्रकारे चुकीच्या पद्धतीने पुढे करण्यात आले, याबाबतही अजित पवार गटाकडून बाजू मांडण्यात येण्याची शक्यता आहे.