मोमोज खाल्ल्याने विषबाधा होऊन महिलेचा मृत्यू

0
91

हैद्राबाद, दि. 29 (पीसीबी) : मोमोज खाणे अनेकांना आवडत असते. परंतू रस्त्याच्याकडेला उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे आरोग्याला धोकादायक असते. शोरमा, पाणीपुरी तसेच मोमोज सारख्या पदार्थांतून यापूर्वी देखील विषबाधा झाल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. अशा हैदराबाद येथील बंजारा हिल्स परिसरात रस्त्यावरील एका फेरीवाल्याकडून मोमोज खाल्ल्याने एका महिलेला विषबाधा होऊन तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात 50 जणांची प्रकृती ढासळली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असून मोमोज विक्री करणाऱ्या दोघा जणांना अटक केली आहे.

हैदराबाद येथील रेशमा बेगम (31 ) त्यांच्या मुलांसह शुक्रवारी मोमोज खाण्यासाठी याच परिसरातील एका विक्रेत्याकडे गेले होते. त्यावेळी परिसरातील इतर लोकांना आणि त्यांना मोमोज खाल्लानंतर शनिवारी सकाळी उलट्या आणि जुलाब होऊ लागले. त्यांना बंजारा हिल्स परिसरातील विविध रुग्णालयात दाखल केले गेले. रेशमा बेगम यांच्या तब्येत जास्त खराब झाल्याने त्यांना निजाम इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथे हलविण्यात आले. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणात मोमोज तसेच मेयोनिज आणि चटणी यातून देखील अन्नपदार्थांत विष तयार झालेले असावे अशी शक्यता अधिकाऱ्यांना वाटत आहे. पेद्दापली येथील मुथारमच्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या 36 विद्यार्थ्यांना देखील अन्नपदार्थांतून विषबाधा झाल्याचे उघडकीस आले आहे. या सर्वांना पेद्दापल्ली येथील रुग्णालयात दाखल केले आहे. या विद्यार्थींनीची प्रकृती आता स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकारी प्रमोद कुमार यांनी सांगितले.