मोठी बातमी! धाराशिवमध्ये होणार फेर मतमोजणी, ईव्हीएमची लागणार कसोटी; शरद पवार गटाने भरली मोठी रक्कम

0
75

धाराशिव, दि. 30 (पीसीबी) : ‘ईव्हीएम’ विरोधात महाविकास आघाडी मैदानात उतरली आहे. 76 लाख मतं आली कुठून या प्रश्नासह काँग्रेस मैदानात उतरली आहे. तिकडे मनसेने सुद्धा या मुद्दावरून नाराजीचा सूर आळवला आहे. राज्यातील काही गावात, मतदान केंद्रावर मतदानात तफावत असल्याचा, मतदार आणि मतदानाची संख्या जुळत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्याविरोधात अर्जफाटे करण्यासोबतच सर्वोच्च न्यायालयात न्याय मागण्याचा मार्ग चाचपण्यात येत आहे. तर दुसरीकडे आता शरद पवार गटाने थेट मैदानातच उडी घेतली आहे. धाराशिवमध्ये फेर मतमोजणीसाठी शरद पवार गटाने मोठी रक्कम भरली आहे. ईव्हीएम या मतमोजणीच्या परीक्षेत पास होते की नापास हे लवकरच समोर येणार आहे.

राज्यात महायुतीची लाट आली आहे. भरभरून मतदान झाले आहे. भाजपाला तर खोऱ्यानं मतं मिळाली आहे. त्यामागे मोठं धोरण आहे. पण विरोधकांना ते पचनी पडत नसल्याचे दिसते. काही मतदार केंद्रावर मतदार कमी आणि मतदान अधिक असा प्रकार समोर आल्याचा दावा विरोधक करत आहेत. तर काही ठिकाणी ऑडियो क्लिपमधून ईव्हीएम हॅकिंग करण्यात आल्याचे समोर आल्याचा दावा करण्यात येत आहे. मतदान आणि मतदारांची आंधळी कोशिंबीर खेळण्यात आली आणि त्यातून महायुतीला भरभरून मतं मिळाल्याचा विरोधकांचा आरोप आहे.

धाराशिव जिल्ह्यातील परंडा मतदारसंघात फेर मतमोजणीची मागणी शरद पवार गटाचे उमेदवार राहुल मोटे यांनी केली आहे. त्यांचा या मतदारसंघात निसटता पराभव झाला. त्यामुळे त्यांनी फेर मतमोजणीची मागणी केली आहे. त्यासाठी 8.5 लाख रुपये त्यांनी निवडणूक विभागाकडे जमा केली आहेत. 18 मशीनची पुन्हा फेर मोजणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे राहुल मोटे यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. अपेक्षित मतदान न मिळालेल्या यंत्रावरील मतांची फेरमोजणी करण्याची मोटे यांनी मागणी केली आहे.

परंडा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे तानाजी सावंत विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार राहुल मोटे यांच्यामध्ये अटीतटीचा सामना झाला होता. या मतदारसंघात तानाजी सावंत यांनी 1509 मताने निसटता विजय मिळवला. तानाजी सावंत यांना 1 लाख तीन हजार 254 तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मोटे यांना 1 लाख 1 हजार 745 एवढे मतदान झाले. त्यानंतर मोटे यांनी फेत मतमोजणीसाठी आग्रही भूमिका घेतली आहे. फेर मतमोजणी झाल्यानंतर काय चित्र राहणार याकडे मतदारसंघातील जनतेचे लक्ष लागले आहे.