‘मी लेचापेचा माणूस नाही`, राजकीय आजार माझ्या स्वभावात नाही : अजित पवार

0
196

पुणे, दि. २५ (पीसीबी) – राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद सुरु असताना अचानक उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यूची लागण झाल्याची बातमी येऊन धडकली. त्यानंतर अजित पवार यांची वारंवार बदललेली कृती पाहता त्यांना राजकीय डेंग्यू तर झाला नाही ना या चर्चांनी जोर धरला.अजित पवारांचं आजारपण खरं की खोटं याची संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली. आज या चर्चांवर अजित पवारांनी पहिल्यांदाच आपल्या खास शैलीत उत्तर दिले आहे. ‘मी लेचापेचा माणूस नाही. गेले 15 दिवस डेंग्यूमुळे आजारी होतो, राजकीय आजार माझ्या स्वभावात नाही. मी माझी मतं गेल 32 वर्षे स्पष्टपणे मांडत असतो’, असे म्हणत अजित पवारांनी विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला. तर अमित शाहांना तक्रार करण्यासाठी भेटलो नसल्याचं स्पष्टीकरण या वेळी अजित पवारांनी दिले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यातील सारथी संस्थेच्या कार्यालयाला भेट देऊन संस्थेच्या आवारात सुरु असलेल्या बांधकामाची पाहणी केली. त्यावेळी अजित पवार बोलत होते. यावेळी अजित पवारांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना काम लवकर करण्याच्या सूचना दिल्या. बांधकामासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन अजित पवार यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले. मराठा समाजाला वेगवेगळ्या योजनांचा लाभ व्हावा आणि मराठा समाजातील तरुणांना प्रशिक्षण मिळावे यासाठी सारथी संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.
अजित पवार म्हणाले, माजी उपपंतप्रधान पहिले मुख्यमंत्री चव्हणांची आज पुण्यतिथी म्हणून त्यांना अभिवादन केलं. दिवाळीपूर्वी डेंग्यूमुळे 15 दिवस वाया गेले. राजकीय आजार माझ्या स्वभावात नाही. मी माझी मतं गेल 32 वर्षे स्पष्टपणे मांडत आलो आहे.
मध्यंतरी अमित शहांना भेटलो. तक्रार करण्यासाठी अमित शाहांना भेटल्याची माहिती खोटी आहे. तक्रार करणे माझ्या स्वभावात नाही.

सरकारी कार्यालये भाड्याच्या जागेत नको : अजित पवार
भाड्याच्या जागेत शासकीय ऑफिस नको आहेत.राज्यात अनेक बदल झाले आहेत. शासकीय इमारती चांगल्या असाव्यात त्या सरकारी जागेत असाव्यात. पुढची 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून चांगले आर्किटेक घेऊन,अधिकाऱ्यांशी बोलून इमारती बांधत आहेत. वेगात काम सुरू आहेत,निधी कमी पडू देणार नाही, कामाच्या बाबतीत गती मंदावू नये असा आमचा मानस आहे. कृषी भवन, कामगार भवन, शिक्षण भवन, सारथीची इमारत या सरकारी जागेत असाव्यात असा निश्चय केला होता. त्याची बहुतेक काम सुरु झालेली आहेत.

भडकाऊ भाषण करू नये : अजित पवार
अंतरवली सराटीतील अटकेबाबत मला माहिती नाही. त्याबाबत माहिती घेतो. आरक्षणाबाबतीत काम सुरू आहे. कोणीही भडकाऊ भाषण करू नये, सुसंस्कृत महाराष्ट्र कसा आहे हे यशवंतराव चव्हाण यांनी दाखवले आहे. सत्ताधारी असो विरोधक असो कोणीही असो त्यांनी भडकाऊ भाषण करू नये. वाचाळवीरांनी समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

सध्या राज्यात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. लवकरच राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांची दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री याच्या उपस्थितीत पाण्याबाबत बैठक घेणार आहे. यासंदर्भात काही सूचना दिल्या आहेत. परत एकदा आढाव घेतला जाणार आहे. दुष्काळाबाबत उपाययोजना सुरू केल्या आहेत, असे अजित पवार म्हणाले.