महिला वकिलाला जेसीबी पाईपने बेदम मारहाण

0
40

दि . १८ ( पीसीबी ) – बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील महिला वकिलाला बेदम मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला होता. गावच्या सरपंचाने आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी या तरुणीला जेसीबीच्या पाईपाने अंग काळं-निळं पडेपर्यंत बेदम मारले होते. यामुळे महिलेच्या अंगातील रक्त साकळले होते. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. मात्र, आता या प्रकरणात एक नवा ट्विस्ट आला आहे. ज्ञानेश्वरी अंजान या तरुणीला कोणीही मारहाण केलेली नाही. उलट तीच गावातील लोकांना त्रास द्यायची. ज्ञानेश्वरीला तिच्या घरच्यांनीच मारहाण केली, असा दावा गावकऱ्यांनी केला आहे. ज्ञानेश्वरी अंजान हिने सनगाव येथील सरपंचासह दहा जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपींचे नातेवाईक आणि गावकऱ्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिल्या आहेत. अँड ज्ञानेश्वरी अंजान हिने गावकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल केले असल्याची माहिती देखील गावकऱ्यांनी दिली आहे. वकिलीच्या जोरावर कायदा कसा चालवायचा हे तिला माहित आहे. त्याच्यामुळे तिने आमच्यावर अगणित खोटे गुन्हे दाखल केले आहेत. माझ्यावर सुद्धा ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल केला होता. माझ्या मुलावर 307 चा गुन्हा दाखल केला होता. आता दाखल केलेल्या गुन्ह्यात देखील गावकऱ्यांनी मारलेलं नाही, त्यांच्या कुटुंबाचे आपसात भांडण झाले आहे, असा दावा गावात राहणाऱ्या पांडुरंग सोपानराव अंजान यांनी केला.
ज्ञानेश्वरी अंजान या रात्री येऊन इतरांच्या घराचे दार वाजवतात. मंदिरात कार्यक्रम सुरू असल्यास तो बंद करायला लावतात तसे न केल्यास धमक्या पण देतात. तिला झालेली मारहाण ही खोटी असून तिच्या घरच्यांनीच केलेली आहे. सगळं प्लॅन करुन केलं आहे, खोटं आहे, असे कल्पना अंकुश अंजान या महिलेने सांगितले.
त्या मुलीचा सगळ्यांवर संशय आहे, पण तसे काही नाही. ती स्वतः मार खाऊन आली आहे तिने सगळ्यांना हे दाखवलं. तुला कोणी मारहाण केली नाही. आमचं मंदिरासमोर घर आहे, आम्हाला कधीच ती बोलते तसा त्रास झाला नाही. तिचं घर कुठे आहे आम्हाला माहीत नाही. ती म्हणते गिरणीचा त्रास होतो. रात्री आठपर्यंत कुणी नसतं मग शेताचे काम करायचं की दळायला जायचं. आम्ही पीठ दळायला नंतर उशिरा गेल्यावर गिरणी बंद करायला लावते, मग गावकऱ्यांनी खायचं काय, असा सवाल गावकरी सोनाली श्रीकृष्ण मुंडे यांनी उपस्थित केला.
आमच्यावर दाखल केलेले संपूर्ण खोटे आहेत. तिला तिच्या घरच्यांनीच मारले आहे. तिला गिरणीचा देखील त्रास होत आहे. रात्री सात वाजता सुरू झालेली पिठाची गिरणी आठ वाजता बंद करायला लावते. ती गावकऱ्यांना शिव्या पण देते. गावात धार्मिक कार्यक्रम करायला तिचा विरोध आहे. मागे एकदा एक गुन्हा दाखल झाला होता त्यामध्ये तिच्याच आजोबाला तिने मारले होते. त्यामध्ये आरोपीवर आरोप खोटे असल्याचे सिद्ध झाले होते. तिने जवळपास अर्ध्या गावावर गुन्हे दाखल केले आहेत, असे गावात राहणाऱ्या नम्रता विनोद रपकाळ यांनी म्हटले.