मतदानाची शपथ घेऊन पिंपरी विधानसभा कार्यालयाकडून मतदान प्रशिक्षणाची सुरूवात…

0
215

लोकसभा निवडणुकीत मतदान केंद्रांवर मतदान व्यवस्था, मतदारांसाठी आवश्यक व्यवस्था तसेच ईव्हीएम मशिन व्हीव्हीपॅट तसेच इतर साहित्य योग्य व सुस्थितीत असल्याची खातरजमा करून मतदान प्रक्रिया सुलभपणे पार पाडावी, असे आवाहन २०६,पिंपरी विधानसभेच्या सहाय्यक निवडणूक अधिकारी अर्चना यादव यांनी केले.

१३ मे रोजी होणाऱ्या मावळ लोकसभा निवडणुकीसाठी पिंपरी विधानसभा कार्यालयांतर्गत नियुक्त करण्यात आलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आज पार पडले त्यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.

या प्रशिक्षणास अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जयराज देशमुख तसेच नोडल अधिकारी, मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष काम करणे केंद्रप्रमुख,सहाय्यक अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

देशमुख यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेबाबत स्लाईड फोटोंसह सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले.
तसेच मतदानाच्या दिवशीच्या मतदान केंद्रावरील प्रक्रियेचे नाटक स्वरूपात सादरीकरण करण्यात आले. यामध्ये नोडल ऑफिसर,सेक्टर ऑफिसर यांनी मतदान अधिकारी यांचे कर्तव्य कसे पार पाडायचे याचे अभिनयाना द्वारे सादरीकरण केले.

चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे झालेल्या निवडणूक प्रशिक्षणासाठी १४२२ यांना कळविण्यात आले होते. त्यापैकी ८३९ एवढे जण प्रशिक्षणासाठी उपस्थित होते.प्रशिक्षणात गैरहजर राहणा-या ४६७ जणांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पिंपरी विधानसभेच्या सहा.निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांनी दिली.

मतदानाच्या दिवशी तसेच एक दिवस आधी करावयाचे कामकाज,कर्तव्य व अनुषंगाने प्राप्त अधिकार त्याचप्रमाणे ईव्हीएम व्हीव्हीपॅट हाताळणी याबाबत अति. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जयराज देशमुख यांनी माहिती देऊन निवडणूक काम करताना कोणतीही चुक होऊ नये यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन केले.